Shiv Sena Aditya Thackeray Press reaction on Dinanath Mangeshkar Hospital woman death case
मुंबई : राज्यामध्ये सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. मात्र नागपूरमध्ये दंगल झाल्यामुळे राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. औरंगजेबाची कबर यावरुन मागील दोन आठवड्यापासून राजकारण रंगले होते. मात्र नागपूरमधील महाल परिसरामध्ये एका जमावाने दगडफेक आणि जाळपोळ केली. यामध्ये आसपासच्या परिसराचे मोठे नुकसान झाले. तसेच गाड्या देखील फोडण्यात आल्या असून पोलिसांवर हल्ला करण्यात आला. यामध्ये 34 पोलीस जखमी झाले आहेत. या प्रकरणावरुन आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आक्रमक झाले आहे.
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी विधीमंडळामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागपूर हिंसाचार आणि दंगलीवरुन महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, नागपूरमध्ये हिंसाचाराच्या अफवा पसरत असताना मुख्यमंत्री कार्यालयाने प्रतिक्रिया का दिली नाही? जेव्हा जेव्हा अशी घटना घडणार असते तेव्हा पहिला अहवाल राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृह विभागाकडे येतो. त्यांच्याकडे याबद्दल कोणतीही माहिती नव्हती का? बीड, परभणी अशा अनेक घटना या राज्यामध्ये होत आहेत, असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “मला वाटते की भाजपा महाराष्ट्राला पुढचे मणिपूर बनवू इच्छित आहे. नागपूरचे रहिवासी पोलिसांना फोन करत होते. मात्र तेच सांगतात की पोलीस उशीरा आले. जर तुम्ही मणिपूरकडे पाहिले तर, तिथे २०२३ पासून हिंसाचार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्या राज्यात सर्वत्र संघर्ष सुरू आहेत. महाराष्ट्र सुद्धा पेटवत ठेवायचं. भाजपा महाराष्ट्रावरही तीच परिस्थितीत आणू इच्छित आहे. राज्याची व्यवस्था कधी बिघडली नव्हती. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेल्या नागपूरमध्ये हे प्रकार घडत आहेत,” असे स्पष्ट मत आदित्य ठाकरे यांनी मांडले आहे.
पुढे ते म्हणाले की, “महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण करायची की त्याने थोडे फार उद्योग येत आहेत ते पण येणार नाही. अशी संघर्षमय परिस्थिती झाल्यानंतर जे काही उद्योगधंदे आहेत ते गुजरातला पाठवायचे. हा भाजपचा पॅटर्न आहे. जिथे शासन चालवणं जमत नाही तिथे ते दंगली घडवायच्या आणि लोकांना त्यात गुंतवणून ठेवायचं,” असा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “देशामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. बेरोजगारी आणि वाढती लोकसंख्या या प्रश्न आहे. मुंबईमध्ये प्रत्येक घरात पाण्याचा प्रश्न आहे. हे प्रश्न पुढे येऊ नये म्हणून 365 वर्षापूर्वी काय घडलं ते काढायचं आणि लोकांना त्यावर भांडत ठेवायचं. व्हिएतनाम हा भारतापेक्षा लहान देश आहे आणि लोकसंख्याही कमी आहे, परंतु त्यांचा इलेक्ट्रॉनिक उद्योग भारतापेक्षा तीन पट जास्त आहे. आपला देश स्वतःला बलवान मानतो, परंतु भाजपा देशाला जिल्ह्यांमध्ये, धर्मांमध्ये आणि जातींमध्ये विभागण्याचा प्रयत्न करत आहे,” असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे.