देवेंद्र फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना, एकनाथ शिंदेंनी दिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना कारवाईचा इशारा
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केली होती. औरंगजेब एक क्रूर प्रशासक होता, तसंच प्रशासन फडणवीस चालवत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं, त्यांच्या या विधानाची राज्यभरात चांगलीच चर्चा रंगली होती. सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात तणाव आहे. त्यावर विधान परिषदेत पडसाद उमटले. हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानावरू त्यांच्यावर कारवाई का करू नये? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
“औरंगजेबाने आपल्या भावाचा खून केला, वडिलांना अटकेत टाकलं, लहान भावाला वेडं ठरवलं. याच्याबरोबर त्यानं छत्रपती संभाजी महाराजांनाही छळलं. त्यामुळे औरंगजेब निश्चित क्रूर होता. देवेंद्र फडणवीस यांचं सरकारही तेवढ्याच क्रूर पद्धतीने कारभार करत आहे”, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांमध्ये औरंगजेबासारखं कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना काय दिसलं. असा कोणता क्रूरपणा दिसला. त्यांचा संभाजी महाराजांप्रमाणे छळ झाला का? असा सवाल त्यांनी केला. कोणाची तुलना कोणाशी करायची याची याचं तारतम्य बाळगलं पाहिजे. ज्यांनी उदात्तीकरण केलं त्यांचं निलंबन केलं आहे. गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असं म्हणत त्यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.
औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात तणावाचं वातावरण असून त्याचे पडसाद आज अधिवेशनातही उमटले. दरम्यान विरोधकांनी केलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच आक्रमक झाले होते. शिवाजी महाराजांचे विचार सोडून औरंगजेबाची विचारसणी असणाऱ्या कॉंग्रेस सोबत गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी मागण्यासाठी यांचे प्रमुख दिल्लीला गेले होते, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नावं न घेता लगावला.
अबू आझमींनी औरंगजेबाला कुशल प्रशासक म्हटलं, असं बोलताना लाज कशी वाटली नाही. औरंगजेबासारख्या आक्रमकांनी पूर्वीच्या खूणा पुसून टाकण्यात आल्या. संभाजी महाराजांच्यावर अतोनात हाल करू त्यांची हत्या करण्यात आली. अशा औरंगजेबाची तुलना कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत केली. त्यांचे संभाजी महाराजांसाराखे हाल झाले का? असा सवाल त्यांनी विरोधकांना केला.
एकनाथ शिंदेंच्या विधानावर ठाकरे गटाच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली. त्याला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले. खुर्चीसाठी तुम्ही शिवाजी महाराजांचे विचार सोडून औरंगजेबाची विचारसरणी असणाऱ्या कॉंग्रेस सोबत गेला. बाळासोहेबांचे विचार सोडले आणि औरंगजेबाचे विचार धरून खुर्ची मिळवी. २०१९ मध्ये सत्ता मिळवली. त्यामुळे तुम्हाला बोलण्याचा अधिकार काय?
हे आणि यांचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागण्यासाठी दिल्लीला गेले होते. मात्र इकडे येऊन पलटी मारली. आशिष शेलार, प्रविण दरेकरांना जेलमध्ये टाकणार होते. मात्र मी यांचा टांगा पलटी केला आणि भाजपसोबत युती करून सत्ता स्थापन केली. मी शिवसेना वाचवली. बाळासाहेबांचे विचार राखले. त्यामुळे जनतेने यांची जागा दाखवली. यांनी १०० जागा लढवली आणि फक्त २० निवडून आल्या. आम्ही ८० लढवल्या आणि ६० जिंकून दाखवल्या, असा टोला त्यांनी ठाकरे गटाला लगावला.