Ajit Pawar Party's Pune City President Deepak Mankar resigns
पुणे : राज्यात विधानसभेचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली आहे. महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली असून यामध्ये जाहीरनामा देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. पुणे शहराध्यक्षांनी पदाचा राजीनामा दिला असून पक्षातील कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. दीपक मानकर म्हणाले की, “2012 सालापासून मी राष्ट्रवादीचे प्रामाणिकपणे काम करतो आहे. 14 महिन्यांपूर्वी मला शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली ती देखील मी जबाबदारी पार पाडली. विधान परिषदेच्या काही जागा राष्ट्रवादी पक्षाला मिळणार असल्यामुळे पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनी शहराचा आणखी विकास करण्याच्या दृष्टीने ही मागणी सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी केली होती. दादांनी कार्यकर्त्यांना शब्द दिला की तो ते पूर्ण करणारच असतात. दादांनी सगळं माझ्या हातात असल्याचं सांगितलं होतं. पण हे सगळ्यामध्ये दोन नाव समोर आली यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला,” असे मत शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी व्यक्त केले.
पक्षाकडून एक रुपया सुद्धा मदत नाही
पुढे आपली नाराजी व्यक्त करत मानकर म्हणाले की, “मी मेरिटमध्ये कुठे कमी पडलो हे मला कळालं पाहिजे. नेत्यांनी देखील यावरुन चर्चा करुन कारण सांगणे गरजेचे होते. कोणतीही चर्चा न करता पंकज भुजबळ आणि नायकवाडी यांना संधी देण्यात आली. आम्हाला नाकारल्याचं कारण देखील सांगण्यात आलं नाही. आम्ही रात्र अन् दिवस पुण्यामध्ये पक्ष संघटना वाढवण्याचे काम करतो. शरद पवारांच्या बालेकिल्ल्यामध्ये आमच्या पक्षाचं काम आम्ही 1500 पक्षाचे पदाधिकारी करतो आहे. यासाठी पक्षाकडून एक रुपया सुद्धा मदत घेत नाही. जे करतो ते मी एकटा करतो. इतर माणसांच्या पुढे पुढे मला करता येत नाही. सारखी पुढाऱ्याच्या पुढे जाऊन गाऱ्हाणी मांडायची. याची सवय मला नाही. मी पदाधिकाऱ्यांना सांगितलं नाही. पण त्यांनी राजीनामे दिले,” अशी भावना दीपक मानकर यांनी व्यक्त केली.
एवढी तप्तरता आमच्याबाबत सुद्धा दाखवा
पुढे ते म्हणाले की, “मी माझ्या पदाचा राजीनामा देतो. मी कायम अजित पवार यांच्यासोबत राहणार हे मी त्यांना शब्द दिला आहे. मी कायम त्यांच्यासोबत राहणार. मी कार्यकर्ता म्हणून जास्त चांगली कामगिरी करेल, शहराध्यक्ष म्हणून विरोध स्वीकारावा लागत आहे. एवढं काम करुन नेत्याला आपली किंमत नसेल तर कार्यकर्ता म्हणून काम केलेले बरं राहिल. एवढी तप्तरता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यामध्ये आहे की, रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष असं परत त्यांचं पद पहिलं सांगितलं. नंतर विधान परिषदेचे उमेदवार सांगितले. एवढी तप्तरता आमच्याबाबत सुद्धा दाखवा. कमीक कमी एक फोन तरी करायचा. यावेळी संधी देऊ शकत नाही नंतर विचार करु, असं तरी म्हणायचं. विचारा तरी कार्यकर्त्यांना…,”असे म्हणत दीपक मानकर यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.