Ambadas Danve claims something bad happened to Krishna Andhale accused in Beed murder case
बीड : बीड हत्या प्रकरणामुळे राज्याचे वातावरण तापले आहे. मागील दोन महिन्यांपासून हे प्रकरण चर्चेत असून राज्यभरातून न्यायाची मागणी केली जात आहे. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. मागील दोन महिन्यांपासून हा फरार असून त्याचा अद्याप शोध घेण्यास पोलिसांना यश मिळालेले नाही. यावरुन आता ठाकरे गटाने गंभीर आरोप केले असून संशय व्यक्त केला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये वाल्मिक कराड याच्यावर मास्टर माईंड आरोपी म्हणून आरोप करण्यात आला आहे. त्याच्यावर देखील मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र अद्याप एक आरोपी सापडलेला नाही. घटनेला दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला आहे. कृष्णा आंधळे असे या आरोपीचे नाव असून तो पोलिसांच्या हाती आलेला नाही.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कृष्णा आंधळे याला पोलिसांनी फरार म्हणून घोषित केले आहे. मात्र पोलिसांना त्याचा सुगावा देखील लागत नसल्यामुळे टीकेची झोड उठवली जात आहे. यामुळे ठाकरे गटाने टीका करण्यास सुरुवात केली आहे. कृष्णा आंधळे याचे काही बरे वाईट तर झाले नाही ना असा सवाल ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे. अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले.
काय म्हणाले अंबादास दानवे?
माध्यमांशी संवाद साधताना बीड हत्या प्रकरणातील आरोपीबाबत अंबादास दानवे यांनी संशय व्यक्त केला. ते म्हणाले की, “राज्य सरकार या प्रकरणाचा तपास लपवून ठेवत आहे. यंत्रणा सरकारच्या दबावात काम करत आहे. एक आरोपी सापडत नाही. या फरार आरोपीचं बरं – वाईट झालं का तपासावं लागेल,” असे धक्कादायक मत अंबादास दानवे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र क्राईमच्या बातम्या वाचा एका क्लिकवर
अंबादास दानवे यांनी शिवरात्रीच्या देखील शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर घृष्णेश्वर मंदिरामध्ये झालेल्या हाणामारीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले की, “आज महाशिवरात्रीचा पावन उत्सव आहे. दरवर्षी मी पूजेला घृष्णेश्वर येथे येत असतो . महादेवाने स्वतः या संस्कृतीच रक्षण केले, संकट सामोरे गेले. आणि प्रथा कायम ठेवली. मनोभावे दर्शन केले तर सर्व मिळत असतं असा माझं अनुभव आहे. मात्र देशासाठी राज्यासाठी चांगल व्हावं. हा मंदिर परिसर पुरातत्व खात्याकडे येतो. पुजाऱ्यांना मर्यादित अधिकार आहेत. जिल्हाधिकारी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली पाहिजे होती. सकाळी त्रास झाला मात्र दिवसभर त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी,” असे मत अंबादास दानवे यांनी व्यक्त केले आहे.