स्वारगेट स्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय मुलीवर अत्याचार झाला धक्कादायक प्रकार समोर आला आहे (फोटो - iStock)
पुणे : पुण्यामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. स्वारगेट बसस्थानकावरील शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला. पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. नराधम फरार असून पोलिसांची पथके आरोपींच्या मागावर आहेत.
पीडित तरुणी ही फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बसस्थानकावर आली होती. मात्र पहाटेच्या साडे पाचच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. दत्तात्रय रामदास गाडे या व्यक्तीने तरुणीला फसवून आगारातील अंधारातील शिवशाही बसमध्ये बसवले. त्यानंतर बसचा दरवाजा लावून घेत तरुणीवर अत्याचार केला. नराधमावर यापूर्वी देखील गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर येत असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र मध्यवर्ती भागातील गजबजलेल्या भागामध्ये असा प्रकार घडल्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. यावरुन आता माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी जोरदार टीका केली आहे. रवींद्र धंगेकर यांनी या पुण्यातील स्वारगेट भागातील अत्याचार प्रकरणावरुन विद्यमान नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत. माजी आमदार धंगेकर म्हणाले की, “स्वारगेटमध्ये हा प्रकार घडला त्याच्या हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे. हा एक प्रकार उघडकीस आला असला तरी हा घडलेला पहिला प्रकार नाही. सर्रास हे प्रकार स्वारगेट भागामध्ये घडत आहेत. स्वारगेट बसस्थानकाच्या आवारामध्ये मटका, दारु आणि अवैध प्रकारचे धंदे सुरु आहेत. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास होत असतो. स्वारगेट बसस्थानकामध्ये माहिती नसलेले लोकांचा फायदा घेण्यासाठी थांबलेले असतात. स्वारगेट स्थानकावर हे प्रकार सर्रास घडत आहेत,” असा आरोप माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
स्वारगेट बसस्थानकावर झालेल्या अत्याचार प्रकरणावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चाकणकर म्हणाल्या की, स्वारगेट बसस्थानक परिसरामध्ये घडलेली ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला असून सकाळी 9 पर्यंत तरुणीने स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलीस पूर्ण प्रयत्नांनी तपास करत असून सीसीटीव्ही फुटेज पाहिले जात आहेत. आरोपीची माहिती पोलिसांना मिळाली असून पुणे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. ही घटना घडली त्यावेळेस पोलिसांचं पेट्रोलिंग सुरु होतं. अनोळखी व्यक्तींशी संवाद करणे टाळावे. मास्क घालून आलेल्या या व्यक्तीने पीडित तरुणीकडे तिला कुठे जायचं आहे याची चौकशी केली. त्यानंतर आरोपी मुलीला घेऊन गाडीपर्यंत गेला आहे. त्यामुळे महिलांनी अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. आरोपीला अटक होऊन पूर्ण कारवाई केली जाईल, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले आहे.