पुणे : राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणामुळे वातावरण गरम झाले आहे. बीडमधील मस्साजोग गावाच सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घुणपणे हत्या करण्यात आली. यामुळे मराठा समाजासह विरोधकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील मास्टर माईंड आरोपी वाल्मिक कराड याचे नाव पुढे येत असून याच्यासोबत मंत्री धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याचा दावा केला जात आहे. यावरुन भाजपचे नेते व आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले आहेत.
भाजप आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासून धनंजय मुंडे यांच्याविरोध भूमिका घेतली आहे. तसेच धनंजय मुंडे यांच्याकडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नको अशी देखील भूमिका सुरेश धस यांनी घेतली आहे. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सुरेश धस म्हणाले की, मी अजितदादांना बोललो होतो, आमच्या पक्षाकडून संधी मिळत नाही तर प्रकाश सोळंकेला पालकमंत्री करा. नाहीतर राजेश विटेकरला करा. दोघांनाही करता येत नसेल बुलढाण्यातील आमदार मनोज कायंदे यांना मंत्रिपद द्या. ते तर घड्याळाकडून निवडून आले आहेत. हे होत नसेल तर आमचा जिल्हा बिनमंत्र्याचा राहू द्या. नाहीतर लोक म्हणतील अजितदादा क्या हुआ तेरा वादा.” अशा शब्दांत सुरेश धस यांनी टीका केली होती. यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन भाजप आमदार सुरेश धस यांचा समाचार घेतला आहे. अमोल मिटकरी यांनी लिहिले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आपल्या पक्षाचे आमदार श्री सुरेश धस यांनी काल परभणी मधील मुक मोर्चात क्या हुआ तेरा वादा अजितदादा अशा प्रकारे वक्तव्य करुन आदरणीय अजितदादाविषयी जी गरळ ओकली त्याबद्दल आपण त्यांना जाब विचारणार की त्यांचा बेभान सुटलेला बैल आणखी मोकाट सोडणार? असा खोचक सवाल अमोल मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. तसेच सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे.
श्री @Dev_Fadnavis जी आपल्या पक्षाचे आमदार श्री सुरेश धस यांनी काल परभणी मधील मुक मोर्चात क्या हुआ तेरा वादा अजितदादा अशा प्रकारे वक्तव्य करुन आदरणीय अजितदादाविषयी जी गरळ ओकली त्याबद्दल आपण त्यांना जाब विचारणार की त्यांचा बेभान सुटलेला बैल आणखी मोकाट सोडणार?
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) January 5, 2025
महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर अजित पवार गटाचे नेते सुरज चव्हाण यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केले आहे. सुरज चव्हाण यांनी लिहिले आहे की, स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येवरून आमदार सुरेश धस जाणीवपूर्वक राजकारण करत आहेत. परभणीच्या सभेत अजित दादांना क्या हुआ तेरा वादा …म्हणून दादांना प्रश्न विचारणाऱ्या सुरेशअण्णाला माझा प्रश्न आहे आरोपी स्वतः होऊन आत्मसमर्पण करत आहेत मग गृह खातं झोपा काढत आहे का? निष्पक्ष चौकशी होईल म्हणून तुमचा गृहखात्यावर आणि गृहमंत्र्यावर विश्वास नाही का? स्व.संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक जरी नेता,कार्यकर्ता जर चौकशीत दोषी आढळला तर अजित दादा त्यांच्यावर कार्यवाही करायला गय करणार नाहीत. देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे सुरेश धस यांना आवरावे. महायुतीत मिठाचा खडा टाकण्याच काम ते करत आहेत. विनाकारण अजितदादांना या प्रकरणात बदमान करण्याचं काम केलं तर जशास तस उत्तर आम्ही देऊ, अशा कडक शब्दांत सुरज चव्हाण यांनी इशारा दिला आहे.
स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येवरून आ.सुरेश अण्णा धस जाणीव पूर्वक राजकारण करत आहेत.परभणीच्या सभेत अजित दादांना क्या हुआ तेरा वादा …म्हणून दादांना प्रश्न विचारणाऱ्या सुरेश अण्णा ला माझा प्रश्न आहे आरोपी स्वतः होऊन आत्मसमर्पण करत आहेत मग गृह खातं झोपा काढत आहे का ? निष्पक्ष चौकशी…
— Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) January 5, 2025