भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये संधी न दिल्यावर भाष्य केले आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण तापले आहे. यंदाची निवडणूक चुरशीची होणार असल्याची शक्यता असताना महायुतीला एकतर्फी यश मिळाले. ऐतिहासिक असे मताधिक्य मिळाल्यानंतर देखील महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु होती. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी न मिळाल्यामुळे महायुतीमधील अनेक जेष्ठ नेते नाराज आहेत. खातेवाटपामुळे देखील नाराजीनाट्य सुरु होते. यामध्ये अजित पवार गटाचे छगन भुजबळ तर शिंदे गटाचे तानाजी सावंत नाराज होते. त्याचबरोबर भाजपमधील अनुभवी नेते असलेले सुधीर मुनगंटीवार यांना देखील मंत्रिपदाची संधी नाकारण्यात आली. यानंतर आता सुधीर मुनगंटीवार यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे.
महायुतीमध्ये नाराजीचा महापूर आला होता. यानंतर अनेक नेत्यांनी माध्यमांसमोर आपली नाराजी उघड देखील केली होती. त्याचबरोबर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांसमोर आपण नाराज नसल्याचे देखील म्हटले होते. त्यानंतर आता सुधीर मुनगंटीवार यांनी एका वाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच त्यांच्या मंत्रिपदाबाबत देखील वक्तव्य केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सुधीर मुनगंटीवार हे मंत्रिपद नसल्यामुळे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा होती. यावर मुनगंटीवार म्हणाले की, पहिल्यांदा पराभव झाल्यानंतर राजकारण सोडण्याचा विचार केला. पण प्रमोद महाजनांमुळे पुन्हा सक्रिय झाल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. ते म्हणाले की, “प्रमोद महाजनांनी १९८९ मध्ये पराभव झालेल्या उमेदवारांची बैठक बोलावली होती. त्यावेळी विनोबा भावेंचा दाखला देत राजकारण सोडण्याचा विचार बोलून दाखवला. हजारो गोड पाण्याच्या नद्या समुद्राला मिळतात, पण समुद्र गोड होत नाही. पण तरीही नद्या वाहायच्या थांबत नाहीत. समुद्राच्या पाण्याचे बाष्पिभवन होऊन गोड पाणी मिळतं असं प्रमोद महाजन म्हणाले. त्यानंतर मी पुन्हा राजकारणात सक्रिय झालो.” अशी आठवण सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितली.
महाराष्ट्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर त्यांच्या मंत्रिपदाबाबत देखील वक्तव्य केले आहे. सुधीर मुनंगटीवार म्हणाले की, “मला मंत्रिपद का मिळालं नाही याची निश्चित माहिती नाही. पण ज्याला कुणाला माझं मंत्रिपद काढून घेण्यात आनंद वाटला त्याला नंतर खंत वाटेल असं काम करण्यासाठी मी मेहनत घेणार असा विश्वास भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. पक्षाचा मूळ विचार कायम ठेवण्यासाठी काही जणांना बलिदान द्यावं लागतं. मलाही तेच करावं लागलं. पण सत्तेचं संगमरवरी स्मारक बांधताना मूळ विचारांची कबर विसरू नये,” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांचा रोख कोणाकडे असल्याची चर्चा सुरु झाली आहे.