Anjali Damania aggressive after Bhagwan Baba Gad Mahant Dr Namdev Maharaj Shastri support Dhananjay Munde
मुंबई : बीड हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचे नाव समोर आले आहे. तसेच वाल्मिक कराड व मंत्री धनंजय मुंडे यांचे अर्थिक संबंध देखील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुढे आणले आहेत. यामुळे बीडमधील नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तसेच मुंडेचे पालकमंत्रिपद देखील काढून घेण्यात आले आहे. यानंतर आता भगवानगडाने मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठिशी खंबीर भूमिका घेतली आहे. यामुळे अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
बीडमधील विरोधी नेत्यांसह सत्ताधारी नेते देखील मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा आहे. बीड हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचे नाव समोर आले होते. तसेच वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांचे संबंध असल्यामुळे राजीनाम्याची मागणी केली जात होती. अंजली दमानिया यांनी सुरुवातीपासून हे प्रकरण उचलून धरले आहे. आता धनंजय मुंडे यांची पाठराखण करणाऱ्या महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांना अंजली दमानिया यांनी उत्तर दिले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अंजली दमानिया यांनी महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. अंजली दमानिया म्हणाल्या की, “भगवानगड हे आपल्या सर्वांसाठीच एक पवित्र स्थान आहे. आणि अशा ठिकाणाहून पत्रकार परिषद घेणं ,एखाद्या राजकारण्याची पाठराखण केली जावी, ते पाहून मला वाईट वाटलं. आपण कोणीही किंव धनंजय मुंडे असोत, मंदिरात किंवा पवित्र स्थानी जाताना, तिथलं आपलं वागणं वेगळं असतं. त्यामुळे नामदेव शास्त्रींनी त्यांचं ते वागणं बघितलं असेल, पण त्यांची (धनंजय मुंडे) जी दुसरी बाजू आहे ती नामदेव शास्त्रींना कदाचित माहीत नसावी, म्हणूनच त्यांनी असं विधान केलं असावं असं मला वाटतंय,” असे मत अंजली दमानिया यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे अंजली दमानिया म्हणाल्या की, “मला त्यांना अतिशय आदरपूर्वक सांगायचं आहे, की तुम्हाला जर याची माहिती नसेल तर मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवते. ती सगळी कागदपत्र तुमच्या पर्यंत पोहोचवेन. मुंडेंविरोधात बोलणारे जे लोक आहेत ते कोणत्याही आकसापोटी बोलत नाहीयेत. जी खरी वस्तुस्थिती आहे, तीच दाखवली गेली आहे. परळीत जी दहशत आहे तीच दाखवली गेली आहे. मी जे धनंजय मुंड्यांविरोधात बोलले ते सुद्धा त्यातलं तथ्य जे आहे, तेच आम्ही सांगितलं आहे. कोणीही त्यामध्ये स्वत:ची मीठ , मिरची लावून बोलत नाहीये. राजकारण हे वेगळं असतं, तिथे अशा शूचिर्भूत ठिकाणाहून हे झालं, ते पाहून मला दु:ख झालं. त्यांनी पवित्र भगवानगडावरुन अशी पत्रकार परिषद घेऊन भूमिका घ्यायला नको होती, कदाचित त्यांना राजकारण हे वेगळे असते हे माहित नसावं,” अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नाराजी व्यक्त केली.