शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार, महापौरांसह १२ नगरसेवकांचा पक्षाला रामराम
विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाची डोकेदुखी वाढली आहे. अनेक नेते कार्यकर्ते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात सामिल होत आहेत. दरम्यान अहिल्यानगर शहरातील नाराज उद्धव ठाकरे शिवसेनेच्या माजी महापौर नगरसेवकांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गट शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. या सर्वांच्या प्रवेशाने अहिल्यानगर शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला मोठे खिंडार पडलं आहे. आज शिंदे गटात प्रवेश करणारे शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर संजय शेडगे यांच्यासह अनेक नगरसेवकांनी प्रवेश केला आहे.
एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के दिले जात आहेत. ते अद्याप थांबताना दिसत नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा पक्षप्रवेश असणण्याची शक्यता आहे.
पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात माजी आमदार महादेव बाबर हे त्यांच्या समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. महादेव बाबर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. महादेव बाबर यांच्यासोबत शहरातील आणखी काही नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे महादेव बाबर नाराज होते. बाबर यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन तिकिटाची मागणी केली होती. बाबर हे हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवार होते. मात्र त्यांची मागणी महाविकास आघाडीकडून डावलण्यात आली.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठी इन्कमिंग होणार असल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील नऊ ते दहा आजी-माजी नगरसेवक करणार एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश होणार आहे. या नगरसेवकांच्या यादीत काही मोठे नाव असण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचेही अनेक नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस नगरसेवकासह माजी आमदार रवींद्र धंगेकर देखील शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धंगेकर यांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसलाही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.