Atishi Marlena's letter to the Assembly Speaker regarding the suspension of AAP MLAs
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. भाजपचा विजय झाल्यानंतर आप पक्षाने विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीच्या सभागृहामध्ये राज्यपालाचे भाषण सुरु असताना मोठा गदारोळ झाला. यामुळे आम आदमी पक्षाच्या २१ आमदारांचे निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र हा निर्णय विरोधी पक्षांवर अन्याय असल्याचे सांगत, दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते आतिशी मार्लेना यांनी आज म्हणजेच २८ फेब्रुवारी रोजी सभापती विजेंदर गुप्ता यांना पत्र लिहून लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याचे आवाहन केले.
विरोधी पक्षनेते आतिशी मार्लेना यांनी सभापतींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “मी हे पत्र खूप दुःखाने आणि वेदनेने लिहित आहे. लोकशाहीची सर्वात मोठी ताकद म्हणजे तिची निष्पक्षता आणि समानता. पण गेल्या काही दिवसांत दिल्ली विधानसभेत जे काही घडले ते केवळ विरोधी आमदारांवर अन्याय करणारे नाही तर लोकशाही मूल्यांनाही मोठा धक्का आहे. त्यांनी पुढे असा आरोप केला की सत्ताधारी पक्षाच्या कोणत्याही आमदारावर कारवाई झाली नाही, असा आरोप आतिशी मार्लेना यांनी केला आहे.
काय म्हणाल्या आतिशी?
आप आमदार आतिशी मार्लेना म्हणाल्या, “२५ फेब्रुवारी २०२५ रोजी, उपराज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान, सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या, तर विरोधी पक्षाच्या आमदारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर करत जय भीमच्या घोषणा दिल्या. सत्ताधारी पक्षाच्या कोणत्याही आमदारावर कारवाई झाली नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे, परंतु जय भीमचा नारा दिल्याबद्दल विरोधी पक्षाच्या २१ आमदारांना सभागृहातून ३ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अतिशी पुढे म्हणाल्या की, “अन्याय इथेच थांबला नाही”, काल जेव्हा निलंबित आमदार विधानसभा परिसरात असलेल्या गांधीजींच्या पुतळ्यासमोर लोकशाही आणि शांततेत निषेध करणार होते, तेव्हा त्यांना विधानसभा प्रवेशद्वारापासून २०० मीटर अंतरावर थांबवण्यात आले आणि त्यांना विधानसभा परिसरात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. ते म्हणाले की, हा केवळ आमदारांचाच नाही तर जनतेने दिलेल्या जनादेशाचाही अपमान आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
२५ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेत तणाव वाढला जेव्हा कॅग अहवाल सादर होण्यापूर्वी झालेल्या गोंधळात सभापती विजेंदर गुप्ता यांनी आतिशी आणि गोपाल राय यांच्यासह आप आमदारांना निलंबित केले होते. यावरुन आता दिल्लीमध्ये राजकारण तापले आहे. विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजप पक्ष आरोप करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आमदार आतिशी म्हणाल्या, “तुम्ही या विधानसभेचे पालक आहात. सर्व आमदारांना, मग ते सत्ताधारी पक्षाचे असोत किंवा विरोधी पक्षाचे असोत, समान न्याय देणे हे पालकाचे कर्तव्य आहे. मी तुम्हाला लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याचे आणि कोणत्याही आमदाराला त्याच्या संवैधानिक अधिकारांपासून वंचित ठेवता येणार नाही याची खात्री करण्याचे आवाहन करतो, असे मत आतिशी मार्लेना यांनी व्यक्त केले आहे.