योगेश कदम यांच्या पुणे क्राईम केसवरील वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया दिली आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला. 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये हा प्रकार करण्यात आला. यामुळे संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला. विरोधकांनी जोरदार टीका केली असून आता आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये देखील महिला सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. यामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणामध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पाहणी करत आढावा घेतला. मात्र यावेळी योगेश कदम यांनी केलेल्या एका विधानामुळे वाद पेटला आहे. याबाबत गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुणे स्वारगेट केसमधील आरोपीला अटक झाली आहे. तो लपून बसला होता त्याला वेगवेगळ्या टेक्नोलॉजीचा वापर करुन त्याला अटक केली आहे. या घटनेचा जो काही पर्दाफाश करायचा आहे तो लवकारत लवकर केली जाईल. त्यासंदर्भात पोलीस कमिशनर यांनी माहिती दिली आहे. मात्र या स्टेजला ही माहिती समोर आणणे योग्य राहणार नाही. योग्य वेळी आली की सांगितली जाईल, असे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या प्रकरणातील आरोपीने तीन वेळी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे. अक्षय शिंदे प्रकरणाची पुनरावृत्ती होतीये का? असा सवाल माध्यमांनी विचारला. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, “हा सगळा तपास प्राथमिक तपास सुरु आहे. सुरुवातीच्या काळामध्ये या गोष्टी बोलणे योग्य ठरणार नाही. पोलिसांनी आरोपी पकडला आहे. तपास सुरु आहे. आमच्याकडे काही टेकनॉलिजी आणि फॉरेन्सिक रिपोर्ट आले आहेत. या संबंधाने पूर्ण तपास केला जाईल,” असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
त्याचबरोबर योगेश कदम यांनी तरुणीने आरडाओरडा करायला हवी होती असे वक्तव्य केले होते. तर संजय सावकारे यांनी अशा घटना फक्त पुण्यामध्ये नाही तर देशभरामध्ये होत असतात असे वक्तव्य केले होते. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न केला असता ते म्हणाले की, “योगेश कदम जे बोलले ते त्याला वेगळ्या पद्धतीने घेतलं गेलं. योगेश कदम जे बोलत होते त्याबाबत माझे असे मत आहे की, ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की, हा गर्दीचा भाग आहे. बस ही जास्त आत नव्हती. बस बाहेरच होती. लोक थोडी बाहेर होती. आरडाओरडा न झाल्यामुळे प्रतिकार करता आला नाही,” असे मत देवेंद्र फडणवीस यांनी योगेश कदम यांच्या वक्तव्याबद्दल सांगितले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे फडणवीस म्हणाले की, “योगेश कदम हे नवीन आहेत. तरुण मंत्री आहेत. काही करण्याचा प्रयत्न करताना अशा प्रकरणाबाबत बोलताना अति संवेदनशील पद्धतीने बोलले पाहिजे हा मी त्यांना सल्ला देईल. बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाज मनावर परिणाम होतो. मंत्री असो किंवा कोणतेही लोकप्रतिनिधी असो अशा केसेसबाबत बोलताना संवेदनशील बोलावे असे माझे मत आहे,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.