bjp minister chandrashekhar bawankule reaction on manikrao kokate Ministry changes
नागपूर : महायुतीच्या नेत्यांबाबत अनेक वादग्रस्त विधाने आणि बेताल वक्तव्ये समोर येत आहेत. यामध्ये अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे हे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले आहेत. माणिकराव कोकाटे यांचे कृषीमंत्रिपद काढून घेण्यात आले आहे. सतत बळीराजाबाबत असंवेदनशील वक्तव्य केली जात असल्यामुळे आणि विधीमंडळाच्या सभागृहामध्ये जंगली रमी खेळल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे यांना आता क्रीडा मंत्रालय देण्यात आले असून कृषीमंत्री म्हणून दत्तात्रय भरणे यांची वर्णी लागली आहे. यावर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नागपूरमध्ये महसूल मंत्री व भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्या खात्यामध्ये बदल करण्यात आल्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. माणिकराव कोकाटे म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी जो निर्णय घेतला असेल तो जनतेमध्ये जो आक्रोश निर्माण झाला होता त्यामुळे हा निर्णय झाला असेल, त्यावेळी मी नव्हतो. एक गोष्ट मात्र पक्की आहे, जनतेला असं वाटत किंवा आक्रोश तयार होतो तेव्हा असा निर्णय घ्यावा लागतो. अजित पवारांच्या पक्षाची ती जबाबदारी होती, अजित पवारांनी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली असेल आणि कृषिमंत्री पद बदलले असेल,” असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महसुली सप्ताहचा शुभारंभ करण्यात आला आहे. याबाबत देखील महसूल मंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली आहे. बावनकुळे म्हणाले की, ‘संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महसूल दिन एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट महसुली सप्ताह शुभारंभ आज झालेला आहे. राज्याचे सर्व पालकमंत्री हा समारंभ आपापल्या जिल्ह्यात करत आहेत, मी नागपूर जिल्ह्यात केला आणि भंडारा जिल्ह्यात जातो आहे. या महसुली सप्ताहात प्रामुख्याने सर्वांसाठी घरे, विशेषतः वेगवेगळ्या योजनेतील लाभार्थ्यांना लाभ देणे, मोजणी करून झाडे लावणे, छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान राबविण्यात वाळू धोरणानुसार समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी समाजातील प्रत्येक माणसाला योजना घरकुल मिळण्यासाठी सात दिवसात काम केलं जाणार,” अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “महाराष्ट्राचे सगळे महसूल अधिकारी हे अभियान उत्कृष्ट पार पाडतील. 17 सप्टेंबर प्रधानमंत्री मोदींचा वाढदिवस आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यंत पंधरा दिवसांचा सप्ताह पाळला जाणार आहे. हे अभियान सुरू केले जाणार आहे, त्याची तयारी आम्ही केलेली आहे. महसूल कार्यालयात 13 हजार प्रकरणे प्रलंबित आहेत ते प्रकरणे निपटारा करण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. 18-19 महसुली अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट काम केलं त्यांचा आम्ही सत्कार केला आहे. उद्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये दोन दिवसाचे महसुली चर्चासत्र ठेवण्यात आलेले आहे. उद्या एक वाजता चर्चा सुरू होईल, त्यात सगळे कलेक्टर आणि विभागीय आयुक्त उपस्थित राहणार आहेत. 2047 चा विकसित महाराष्ट्र या दृष्टीने आमचा प्लान तयार केला आहे. मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी दिली होती प्रेझेंटेशन इथे होणार आहे,” अशी माहिती देखील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.