bjp amit shah in maharashtra for vidhansabha elections 2024
ठाणे : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी देखील राज्यातील संभाव्य तयारी आणि प्रमुख पक्षांची चर्चा करुन गेले आहेत. त्यामुळे लवकरच निवडणूका जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे महायुतीसह महाविकास आघाडी जोरदार कामाला लागली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये अपेक्षित यश न आल्यानंतर भाजप पक्ष मास्टर प्लॅन तयार करण्याच्या मागे लागले आहे. यामुळे केंद्रीय भाजप पक्षश्रेष्ठींचा महाराष्ट्र दौरा वाढला आहे. मागील आठ दिवसांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आजपासून दुसरा महाराष्ट्र दौरा सुरु आहे.
लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर आता विधानसभेसाठी भाजप ‘ताक देखील फुंकून पीत’ आहे. महायुती म्हणून ही पहिलीच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे काही जागांवरुन आणि मुख्यमंत्रिपदावरुन महायुतीमध्ये वादंग निर्माण झाला आहे. आता हा वाद सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह स्वतः महाराष्ट्रामध्ये दाखल होत आहेत. मागील आठ दिवसांमध्ये अमित शाह यांचा दुसरा दौरा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दौरे असून यामध्ये अमित शाह भाजप नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देत आहेत. विविध मतदारसंघांचा अभ्यास आणि संभाव्य स्थितीचा आढावे घेत आहेत. आता अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आले आहे.
कसा असणार दौरा?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आता दोन दिवसीय मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. ते मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कोकण विभागातील मतदार संघाचा आढावा घेणार आहेत. या भागातील सर्व आमदार, पदाधिकाऱ्यांसोबत अमित शाह हे स्वतः संवाद साधणार आहेत. मुंबईतील आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत अमित शाह यांची दुपारी दीड वाजता बैठक आहे. ही बैठक दादरमधील स्वामी नारायण मंदिरातील योगी सभागृहात होणार आहे. तर नवी मुंबईतील सिडको ऑडिटोरियममध्ये सायंकाळी साडेचार वाजता ठाणे आणि कोकण विभागातील आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांसोबत अमित शाह संवाद साधणार आहेत. असा अमित शाह यांचा दौरा असणार आहे. या बैठकीनंतरच मुंबई, ठाणे व कोकण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार ठरणार आहेत. तसेच अमित शाह हे कौपरखैरणेतील संघ शाखेला भेट देणार आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत अमित शाह हे रात्री राजकारणाची खलबत करणार आहेत. रात्री सह्याद्री अतिथीगृहावर महायुतीच्या जागा वाटपाबाबत अमित शाह चर्चा करणार आहेत.
हे देखील वाचा : राजस्थान, मध्यप्रदेश निवडणूक पॅटर्न; महाराष्ट्रासाठी भाजपचा ‘तोच’ मास्टरप्लॅन
अमित शाहांचा महाराष्ट्रासाठी खास प्लॅन
मागील आठवड्यामध्ये देखील अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यांच्या दोन दिवसीय दौऱ्यावेळी त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेतला. महायुतीसाठी पश्चिम महाराष्ट्र हा अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जात आहे. कारण या भागामध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसत असून यामुळे एकूण जागांमध्ये महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमित शाह यांनी पश्चिम महाराष्ट्र दौरा केला. यावेळी त्यांनी कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक या भागांचा दौरा केला. उत्तर महाराष्ट्राचा देखील अमित शाह यांनी आढावा घेतला. त्यानंतर आता मुंबई, नवी मुंबई आणि कोकण विभागाचा आढावा अमित शाह घेणार आहेत. त्याचबरोबर येत्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील ठाणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे हा आठवडा भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. नवरात्रीमध्ये भाजपची विधानसभा निवडणूकीची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.