Minister Jayakumar Gore's breach of rights motion against Sanjay Raut
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीमधील अनेक नेत्यांवर विरोधकांनी जोरदार टीका आणि गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या देखील राजीनामा दिला आहे. यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जयकुमार गोरे यांनी एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवले असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी आमदार रोहित पवार यांच्याकडून करण्यात आला. यामुळे आता जयकुमार गोरे यांनी आक्रमक पवित्रा घेत नेत्यांवर हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केला आहे.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून अनेक मुद्द्यांवरुन ते गाजते आहे. यामध्ये भूमिका मांडताना मंत्री जयकुमार गोरे यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे. याबाबत बोलताना जयकुमार गोरे म्हणाले की, “2017 मधील सातारा न्यायालयातील प्रकरण 479 चा आधार घेऊन त्या बाबत मीडियामधून माझ्यावर बिनबुडाचे, अश्लाघ्य, आक्षेपार्ह भाषा वापरुन बेछूट आरोप करण्यात आले. माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. माझी जनमानसातील प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला. राज्याचा मंत्री म्हणून सभागृहात काम करताना चुकीच्या टीकेला तोंड द्यावं लागलं. सभागृहाच्या कामकाजावर परिणाम व्हावा अशी कृती जाणीवपूर्वक केली. सदर गुन्ह्यात न्यायालयाने 2019 मध्येच मुक्तता केली आहे. न्यायालयाने निकालपत्र दिलं आहे, तरी संजय राऊत यांनी मीडियासमोर येऊन जाणीवपूर्वक माझी बदनामी केली. त्यामुळे त्यांनी माझा व सभागृहाचा विशेषधिकार भंग केला. न्यायालयाचा अवमान केला. सार्वभौम सभागृहाचा आपमान केला आहे. म्हणून मी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडतोय” असे मत जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नेत्यांसोबतच एका युट्युब चॅनेलवर देखील कारवाईची मागणी केली आहे. ते म्हणाले की, “लयभारी हे एक युट्यूब चॅनल आहे, त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून किमान 87 व्हिडिओ क्लिप बनवल्या. माझ्या, माझ्या कुटुंबाची, पक्षाची बदनामी केली. अत्यंत नीच, खालच्या पातळीवर जाऊन सातत्याने अडीच वर्षापासून हे चॅनल टीका करत आहे. या प्रकरणात न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणता आपण जबाबदारीने वागलं पाहिजे, माझी, माझ्या कुटुंबाची बदनामी होईल असं वर्तन या युट्यूब चॅनलने केलेलं आहे. त्या ‘लय भारी’ युट्यूब चॅनलच्या तृषार आबाजी खरात विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मी सभागृहात मांडत आहे,” असे जयकुमार गोरे म्हणाले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे जयकुमार गोरे म्हणाले की, “जयकुमार गोरे दोषी असेल, तर त्याला फासावर द्या. पण अशा पद्धतीने अर्ज देणं, प्लान करणं. चौकशी केल्यावर संबंधित सांगतात की, मी अर्ज केला नाही. याची चौकशी झाला पाहिजे. कारवाई झाली पाहिजे. “माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, राज्यपालांना खोट निवेदन देणं, एखाद्या कुटुंबाला, नेतृत्वाला आयुष्यातून उद्धवस्त करण्याचा प्लान करणं हे घातक आहे. या प्रकरणात मी जास्त काही बोलणार नाही. पण याच सभागृहात काही सदस्य आहेत, ज्यांना विधान परिषदेतील पराभव सहन झाला नाही. म्हणून माझ्याविरोधात षडयंत्र केलं,” असा आरोप जयकुमार गोरे यांनी केला आहे.