
For the local body elections, the BJP party has a large number of aspiring candidates
BJP Politics : नांदेड : भारतीय जनता पक्षात सध्या एक वेगळीच कार्यपद्धती रुजताना दिसत आहे. भाषणांमध्ये विचारधारा, निष्ठा आणि संघटनात्मक शिस्त यांचे गोडवे गायले जात असले, तरी प्रत्यक्ष राजकारणात मात्र सध्या कोण उपयुक्त? हा एकच निकष प्रभावी ठरत असल्याचे चित्र आहे. याच प्रवृत्तीतून पक्षात ‘प्रासंगिक कार्यकर्ता’ हा नवा प्रकार पुढे आला असून, वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणारे निष्ठावंत कार्यकर्ते मात्र अस्वस्थ झाले आहेत.
नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही स्थिती अधिक ठळक झाली आहे. निवडणूक व्यवस्थापनाची सूत्रे ज्यांच्याकडे आहेत, त्यांच्या भोवती अचानक गर्दी वाढली आहे. कालपर्यंत पक्षाशी फारसा संबंध नसलेली मंडळी आज भाजपाची टोपी घालून उमेदवारीसाठी विविध क्लृप्त्या लढवत आहेत. तिकीट मिळवणे हेच अंतिम ध्येय ठेऊन आलेली ही ‘कराराधारित निष्ठा’ पक्षात चर्चेचा विषय ठरली आहे
हे देखील वाचा : महिलांचा अपमान थांबणार कधी? नीतीश कुमारांच्या हिजाब ओढण्याने दुखावली डॉक्टर, थेट सोडला बिहार
सध्याच्या परिस्थितीत पक्षात तीन स्पष्ट प्रवाह दिसतात. एकीकडे सत्ता नसतानाही गल्लोगल्ली फिरत संघटन उभे करणारा जुना कार्यकर्ता. दुसरीकडे राजकीय हवामान पाहून भूमिका बदलणारा गट. आणि तिसरा निवडणुकीच्या काळात सक्रिय, अन्य वेळी अलिप्त राहणारा’ वेळेपुरता कार्यकर्ता’. विशेष बाब म्हणजे सध्या तिसऱ्या प्रवाहालाच सर्वाधिक महत्त्व दिले जात असल्याची भावना पक्षांतर्गत पसरली आहे. पूर्वी काँग्रेसच्या दबावाला तोंड देत, अपमान सहन करत पक्षाची धुरा वाहणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी आज वेळ नाही, अशी कुजबुज आहे.
उलटपक्षी, अलीकडेच प्रवेश केलेल्या नेत्यांसाठी दरवाजे सहज उघडले जात आहेत. त्यामुळे अनुभव आणि निष्ठेपेक्षा “सध्याची उपयुक्तता” अधिक महत्त्वाची ठरू लागल्याचे दिसते. यामुळे अनेक जुने कार्यकर्ते स्वतःलाच प्रश्न -विचारू लागले आहेत आपण पक्षासाठी आहोत की केवळ भूतकाळाचा भाग? असा सवाल केला जात आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासोबत भाजपात आलेल्या काही गटांचा म आत्मविश्वास शहरात ठळकपणे जाणवतो. त्यांच्या सभोवती फिरणाऱ्या इच्छुकांमध्ये उमेदवारी जवळपास ठरल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावरील फोटो, सततचे संपर्क आणि अफांचा बाजार, या माध्यमातून राजकीय वातावरण तापले असताना, तळागाळातील कार्यकर्ते मात्र संभ्रमात सापडले आहेत.
हे देखील वाचा : सात तासांची शोधमोहीम; आता मीरा भाईंदरमध्ये बिबट्याची दहशत,हल्ल्यात सात जण जखमी
मुलाखतींचा विषय चिंतेचा
विशेष चिंतेची बाब म्हणजे उमेदवारांच्या मुलाखतीत विचारधारा आणि संघटनात्मक योगदानापेक्षा आर्थिक क्षमतेवर भर दिला जात असल्याची चर्चा आहे.’ प्रचारासाठी किती खर्च करू शकता? किवा पक्षाला किती आर्थिक मदत देणार? असे प्रश्न महत्वाचे ठरत असल्याने, वैचारिक बांधिलकी दुय्यम ठरत असल्याची भावना निष्ठावंतांमध्ये आहे. जर उमेदवारीचे निकष आधीच ठरले असतील, तर वारंवार मुलाखतीचा दिखावा कशासाठी, असा सवालही उपस्थित केला जात आहे. या सगळ्या घडामोडीमुळे एक मूलभूत प्रश्न उभा राहतो. हा वाढता जनसंपर्क म्हणजे खरोखर संघटन मजबूत होत आहे की केवळ तात्पुरती फुगवटा निर्माण होत आहे? आज जे सोयीस्कर कार्यकर्ते आहेत, ते उद्या परिस्थिती बदलताच दुसऱ्या दिशेने वळणार नाहीत, याची हमी कोण देणार? असा सवाल कार्यकत्यांचा आहे. भाजपाची ही बदलती कार्यसंस्कृती पक्षाला निवडणुकीत लाभ देईल की दीर्घकालीन निष्ठेला तडा देईल? हा प्रश्न केवळ चर्वेपुरता मर्यादित राहिला नसून, संघटनाच्या भविष्यासाठी निर्णायक ठरत आहे.