
Ganesh Bidkar elected as Pune Municipal Corporation BJP group leader
PMC News : पुणे : मागील काही दिवसांपूर्वी राज्यामध्ये महापालिका निवडणूका (PMC Election 2026) पार पडल्या आहेत. 29 महापालिकांसाठी मतदान पार पडले असून भाजपला भरघोस यश मिळाले. पुणे महापालिकेमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. त्यामुळे पुणे महापालिकेवर भाजपचाच झेंडा आणि भाजपचाच महापौर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी आता राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, पुणे महानगरपालिका भाजपा गटनेते पदी गणेश बिडकर यांची निवड करण्यात आली आहे.
पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचे 119 नगरसेवक निवडून आले आहेत. या सर्व नवनिर्वाचित नगरसेविकांची बैठक पार पडली. यामध्ये भाजपच्या ११९ नगरसेवकांनी एकत्र येत ‘पुणे महानपालिका भारतीय जनता पार्टी गट’ स्थापन करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे. नगरसेवकांची ही बैठक २७ जानेवारी २०२६ रोजी पार पडली. या संदर्भातील पत्र भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने पुणे महापालिका आयुक्तांना पाठवण्यात आले आहे.
हे देखील वाचा : शरद पवारांचा आधार गेला…! अजित पवारांची या वेळी मात्र वेळ चुकली
याच बैठकीत प्रभाग क्रमांक २४ ड मधून निवडून आलेले नगरसेवक गणेश मधुकर बीडकर यांची भाजप गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीची नोंद पुणे महापालिकेचे आयुक्त तसेच विभागीय आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे. भाजपच्या वतीने आयुक्तांकडे करण्यात आलेल्या या पत्राद्वारे गटनोंदणीस पक्षाची अधिकृत मान्यता देण्यात यावी आणि त्यानुसार पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. हे पत्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुणे महापालिका आयुक्तांना लिहिले आहे. महापालिकेत भाजपचा सर्वात मोठा गट स्थापन झाल्याने आगामी महापौर, उपमहापौर तसेच विविध स्थायी समित्यांच्या अध्यक्ष पदी भाजपचेच नगरसेवक नेमले जाणार आहेत.
हे देखील वाचा : पुण्याचा महापाैरपदाबाबत मोठी अपडेट; ‘या’ तारखेला होणार अधिकृत घोषणा
कोण होणार पुण्याचा महापौर?
पुण्याचा महापाैर काेण ? हे ३ फेब्रुवारीलाच स्पष्ट हाेणार आहे. प्रत्यक्षात ९ फेब्रुवारीला निवडणुक झाल्यानंतर त्याची अधिकृत घाेषणा केली जाईल. महापालिका निवडणुक नुकतीच पार पडली आहे. भाजप हा सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष ठरला असून, त्यांच्यात या पदासाठी काेणाला संधी दिली जाणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. यावेळी महापाैर पदासाठी महिला (सर्वसाधरण) हे आरक्षण पडले आहे. यामुळे ज्येष्ठ नगरसेविका रंजना टिळेकर, वर्षा तापकीर, मानसी देशपांडे, मंजुषा नागपुरे, स्मिता वस्ते आदींची नावे चर्चेत आहेत. टिळेकर या विधान परीषद सदस्य याेगेश टिळेकर यांच्या आई आहेत. तर देशपांडे या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या वहीनी आहेत. तर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडून नागपुरे यांच्या नावाला पसंती दिली जाऊ शकते. तापकीर यापुर्वी स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत हाेत्या, परंतु त्यांना संधी मिळू शकली नव्हती. त्यामुळे त्या देखील या पदाच्या दावेदार ठरू शकतात.