BJP women leader Chitra Wagh reacts to actress Prajakta Mali controversy
मुंबई : राज्यामध्ये सध्या बीड हत्या प्रकरणावरुन राजकारण तापले आहे. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष गायकवाड यांचे अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाला होऊन 20 दिवस झाले असेल तरी देखील अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणामध्ये भाजप आमदार सुरेश धस यांनी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे नाव घेतल्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. याबाबत भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
भाजपचे नेते व आमदार सुरेश धस यांनी बीडमधील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण केला आहे. तसेच यासाठी माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांना जबाबदार धरले आहे. मात्र धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना सुरेश धस यांनी सिनेविश्वातील काही महिला कलाकारांची नावे घेतली. यामध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे देखील नाव घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली. इव्हेंट मॅनेजमेंट म्हणत प्राजक्ता माळींबद्दल त्यांनी वक्तव्य केले. याबद्दल रोष व्यक्त केला असून अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका देखील स्पष्ट केली आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन आमदार सुरेश धस यांना जोरदार खडेबोल सुनावले आहेत. तसेच त्यांनी जाहीर माफी मागावी असे देखील मत प्राजक्ता माळी हिने व्यक्त केले आहे. त्याचबरोबर अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून यासंदर्भात त्यांच्यासमोर भूमिका मांडणार असल्याचे देखील तिने स्पष्ट केले आहेत. त्यानंतर आता भाजपमधील महिला नेत्या अभिनेत्री प्राजक्ता माळीची बाजू घेण्यासाठी सरसावल्या आहेत.
विधान परिषद आमदार व भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच प्राजक्ता माळी हिला धीर देण्याचा देखील प्रयत्न केला आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “स्त्री चा सन्मान याला भाजपाचे सर्वोच्च प्राधान्य कायमच राहीले आहे … त्यामुळे कुणालाही कुणाचेही नाव घेऊन अशा पद्धतीने चिखलफेक करण्याचा अधिकार नाही… आपण सर्वांनी मिळून एका चांगल्या समाजाची निर्मिती करण्यासाठी कायम पुढाकार घेतला पाहिजे… या लढाईत प्राजक्ता एकटी नाही हा विश्वास देते,” असे मत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केले आहे.
स्त्री चा सन्मान याला भाजपाचे सर्वोच्च प्राधान्य कायमच राहीले आहे …
त्यामुळे कुणालाही कुणाचेही नाव घेऊन अशा पद्धतीने चिखलफेक करण्याचा अधिकार नाही…आपण सर्वांनी मिळून एका चांगल्या समाजाची निर्मिती करण्यासाठी कायम पुढाकार घेतला पाहिजे…
या लढाईत प्राजक्ता एकटी नाही हा विश्वास…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 29, 2024
महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर भाजपचे नेते व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केली असून भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेली टीका चुकीची असल्याचे म्हणाले आहेत. चंद्रकांत पाटील म्हणाले की, “आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी नेहमीच स्त्रीचं चरित्र आणि त्याच्यावर शिंतोडे उडू नये याची काळजी घेतली. मात्र सध्या महिलांची बदनामी होईल असं बोलणं सुरु आहे. तो विषय सुरु आहे तो राजकीय आहे. तसाच समाजिक आणि संवेदनशील विषय देखील आहे. मात्र असं नाव जोडणं योग्य नाही. सुरेश धस हे माझे चांगले मित्र आहेत. ते पार्टीचे कार्यकर्ते देखील आहेत. मी काल गुजरातला गेलो होतो. मी त्यांना काल दोन वेळा फोन लावला. पण लागला नाही. त्यांनी मी आज सांगेन की, एका महिलेची बदनामी होईन असे वक्तव्य करणं योग्य नाही. त्यांना ते शोभत नाही. ते पार्टीचे कार्यकर्ते असल्यामुळे पार्टीत बोलायला पाहिजे,” अशी भूमिका मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली.