सौजन्य - नवराष्ट्र टीम
बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेवरुन सध्या राजकारण तापले आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अशातचं बीडच्या परळी तालुक्यातील कनेरवाडी येथील कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी ट्विट केला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करत फडला अटक केली होती, पण 24 तासात कैलास फड याला हवेत गोळीबार केल्याप्रकरणी जामीन मंजूर झाला आहे.
कैलास फड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे. बीडच्या परळी तालुक्यातील कनेरवाडी येथील कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी ट्विट केला होता. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला, त्यानंतर कैलास फडला अटकही करण्यात आली आणि न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली, त्यानंतर आता कैलास फड याला जामीन मिळाला आहे. एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर कैलास फड याला परळी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडून जामीन मंजूर झाला आहे. 50 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जमीन मंजूर झाला आहे.
फरार आरोपींची संपत्ती जप्त करा
बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीनं सुरु करा, तसेच बंदुकीसोबत ज्या कोणाचे फोटो आहेत, त्यांचे परवाने रद्द करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
देवेंद्र फडणवीसांचे आदेश काय?
बीड जिल्ह्यातील काही नेत्यांचे बंदुकीतून गोळी झाडत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. बंदुकीसह ज्यांचे- ज्यांचे फोटो आहेत, ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करा. ही प्रक्रिया तातडीने सुरू करा. तसेच आतापर्यंत ज्या बंदुकीचे परवाने दिले आहेत, त्यांचा तातडीने फेरआढावा घ्या, असे निर्देश देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत.
हे सुद्धा वाचा : 2 तारखेच्या आधी आरोपींना अटक करा, नाहीतर मी…; खासदार बंजरंग सोनावणेंचा अल्टिमेटम
सरपंच देशमुख यांच्या हत्येमुळे वातावरण तापलं
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण झालं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनीही या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता हा मुद्दा देशभरात गाजताना दिसत आहेत.