CM Devendra Fadnavis reacts to RSS Bhaiyaji Joshi controversial Marathi statement
मुंबई : आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. नुकतेच राजधानी दिल्लीमध्ये अखिल मराठी साहित्य संमेलन देखील पार पडले. मात्र मराठी भाषेची महाराष्ट्रामध्येच गळचेपी होत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते भैयाजी जोशी यांनी मुंबईमध्ये एका कार्यक्रमामध्ये मराठी भाषेबद्दल वादग्रस्त विधान केले. यावरुन आता राजकारण रंगले आहे. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळामध्ये स्पष्टीकरण दिले आहे.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावरुन आक्रमक भूमिका घेतली खासदार राऊत म्हणाले की “भैय्याजी जोशी असं म्हणतात की, मुंबईत येऊन कोणी कोणतीही भाषा बोलू शकतो. कारण मुंबईला कोणतीच भाषा नाही. त्यांचं म्हणण आहे की, घाटकोपरची भाषा गुजराती आहे. ते तामिळनाडूत जाऊन चेन्नईत असं बोलू शकतात का?. बंगळुरु, लुधियानाला, पाटण्याला, लखनऊला जाऊन हे .बोलू शकतात का? महाराष्ट्राच्या राजधानीत येऊन सांगतात मुंबईची भाषा मराठी नाही, ती गुजराती आहे अन्य आहे. मराठी येण्याची गरज नाही, मराठी आमची राजभाषा आहे. राजभाषा असेल तर अशा प्रकारचे वक्तव्य म्हणजे राजद्रोह आहे” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या प्रकरणावरुन विरोधकांनी जोरदार टीका केल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. फडणवीस म्हणाले की, भैय्याजी जोशी यांचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही. ते पूर्णपणे ऐकून, माहिती घेऊन मी बोलेन.पण सरकारची भूमिका पक्की आहे. मुंबईची, महाराष्ट्राची , महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे. माझ्या वक्तव्यात, त्या संदर्भात भय्याजी जोशी यांचं दुमत असेल असं मला वाटत नाही. तथापि पुन्हा एकदा शासनाच्या वतीने सांगतो, मुंबईची भाषा मराठी आहे, महाराष्ट्राची भाषाही मराठी आहे. इतर भाषांचा इथे सन्मान आहे. कोणत्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही. कारण जो स्वत:च्या भाषेवर प्रेम करतो, तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करू शकतो, त्यामुळे तो सन्मान आहेच. म्हणूनच शासनाची भूमिका पक्की आहे, शासनाची भूमिका मराठी आहे, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या प्रकरणावर भाजप आमदार राम कदम यांनी देखील प्रतिक्रिया देत भैय्याजी जोशी यांची पाठराखण केली आहे. ते म्हणाले की, त्याग पुर्ण आणि समर्पित राष्ट्रासाठी जीवन जगणारे भैय्या जोशी यांच्या विधानाला तोडूमोडून वेगळ्या दिशेने दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांच्या बोलण्याचा अर्थ एकच आहे, घाटकोपरच्या एक विशिष्ठ भागात गुजरात भाषिक वर्ग राहतो त्यामुळे त्यांच्या संवादाची भाषा वेगळी. मुंबईतील भाषा काल ही मराठी होती आजही आहे, मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला गेला आहे,. जे अबु आझमीला स्वत: च्या मांडीवर बसून त्यांच्या आधारावर सरकार चालवत होते, ते आता आमच्यावर बोलणार आहेत, असे म्हणत राम कदम यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे.