मुंबईची भाषा मराठी नसल्याचे म्हटल्यामुळे भैय्याजी जोशी यांच्यावर संजय राऊतांचा घणाघात (फोटो - टीम नवराष्ट्र)
मुंबई : राज्यामध्ये अनेक मुद्द्यांवरुन राजकारण रंगले आहे. राज्यातील बीड हत्या प्रकरणावरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. भैय्याजी जोशी यांनी मुंबईमध्ये येऊन मराठी भाषेबाबत वक्तव्य केले. यामुळे आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत. त्यांनी जोरदार हल्लाबोल केला असून हे इतर राज्यांमध्ये जाऊन बोलण्याची हिंमत आहे का? असा सवाल देखील खासदार राऊत यांनी उपस्थित केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. खासदार राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात कालपासून दोन विषय चर्चेत आहेत. अस्वस्थ करणारे आहेत. पहिला विषय भाजपचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भय्याजी जोशी हे काल मुंबईत आले. त्यांनी जाहीर केलं की, मुंबईची भाषा मराठी नाही. हा अत्यंत गंभीर विषय आहे. मराठी मीडियाने कसं दुर्लक्ष केलं याकडे? तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का? भाजपचे प्रमुख नेते मुंबईत येऊन सांगतात, मुंबईची भाषा मराठी नाही, राज्याच्या मुख्यमंत्र्याने हे सहन करावं,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे खासदार राऊत म्हणाले की “भैय्याजी जोशी असं म्हणतात की, मुंबईत येऊन कोणी कोणतीही भाषा बोलू शकतो. कारण मुंबईला कोणतीच भाषा नाही. त्यांचं म्हणण आहे की, घाटकोपरची भाषा गुजराती आहे. ते तामिळनाडूत जाऊन चेन्नईत असं बोलू शकतात का?. बंगळुरु, लुधियानाला, पाटण्याला, लखनऊला जाऊन हे .बोलू शकतात का? महाराष्ट्राच्या राजधानीत येऊन सांगतात मुंबईची भाषा मराठी नाही, ती गुजराती आहे अन्य आहे. मराठी येण्याची गरज नाही, मराठी आमची राजभाषा आहे. राजभाषा असेल तर अशा प्रकारचे वक्तव्य म्हणजे राजद्रोह आहे” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, “106 हुतात्म्यांनी महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी मराठी भाषेसाठी बलिदान दिलं, ते हे ऐकण्यासाठी का? सध्याच्या सरकारला थोडा जरी स्वाभिमान, मराठी भाषेचा अभिमान आहे का? राज्य गौरव गीत गाता, त्याचा शो करता. तुम्ही मराठी भाषा गौरव दिवस साजरा करता, तिथे भाषण करता आणि या मुंबईत येऊन तुमच्या पक्षाचे प्रमुख नेते, विचारधारा वाहक मुंबईची भाषा मराठी नाही सांगतात हा अपमान नाही का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे संजय राऊत यांनी भैय्याजी जोशी म्हणाले की, भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे. ठराव मजूर केला पाहिजे. माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार म्हणवणारे मिधें सत्तेत बसले आहेत, कुठे आहेत ते? माननीय बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी, भाषेसाठी आपलं आयुष्य पणाला लावलं. जे आज विचारवाहक बसले आहेत, त्यांनी हिंमत असेल तर भैय्याची जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध करावा. भैय्याजी जोशींसंदर्भात महाराष्ट्र विधानसभेत राज्य सरकारने निंदा ठराव आणून धिक्कार करावा, नाही तर तुम्ही मराठी आईच दूध प्यालेले नाहीत. तुमच्या दूधात भेसळ आहे. तुमच्या जन्मात भेसळ आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना हे सहन करणार नाही. कालपासून आमचं रक्त खवळलंय, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.