'...तर ते माझ्या टार्गेटवर असतील, त्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' होईल'; सतेज पाटील यांनी दिला इशारा
कोल्हापूर : बंटी पाटील म्हणजे माणसं तयार करणारी फॅक्टरी आहे. ज्यांना मोठे केलं ते जात आहेत, याचा काही फरक पडत नाही. जे गेले त्यांनी निर्णय घेतला आहे. जे अजूनही नाराज आहेत, त्यांनीही निर्णय घ्यावा. पण जे शेवटच्या क्षणी साथ सोडण्याच्या निर्णय घेतील ते माझ्या टार्गेटवर असतील. तेव्हा माझा मुक्काम त्याच वॉर्डात असेल. त्यांचा करेक्ट कार्यक्रम होईल हे लक्षात ठेवा, असा गर्भित इशारा काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते तथा कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरमध्ये झालेल्या निर्धार मेळाव्यामध्ये दिला.
काँग्रेस जिल्हा कमिटीमध्ये काँग्रेसचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्याला खासदार शाहू महाराज यांची सुद्धा उपस्थिती होती. यावेळी बोलताना पाटील यांनी कोल्हापूर महापालिका ‘एकच मिशन’ असल्याचे लक्षात ठेवा असा निर्धार या मेळाव्यामध्ये बोलताना व्यक्त केला. ते म्हणाले की, शाहू महाराज माझं काही चुकीच असेल तर नक्की सांगा. मी आयुष्यभर काँग्रेस म्हणूनच काम करणार असल्याचं पाटील म्हणाले. ‘आता आपल्याला खचून चालणार नाही, लढाई आपली आहे. तुमच्यासारखी जिवाभावाची माणसं असणे गरजेची आहेत. फौज किती मोठी असली तरी हम ही जितेंगे हे लक्षात ठेवा’ असं पाटील यांनी सांगितले.
काँग्रेस पक्ष नाही, तर लोकांपर्यंत पोहोचणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्ष ताकदीने उभा राहणार आहे. येणाऱ्या काळामध्ये १८ ते २५ वयोगटापर्यंत काँग्रेस पक्ष पोहोचला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. या वयोगटाला भाजपचा वास्तव सांगितले पाहिजे. आयुष्यामध्ये आतापर्यंत अनेक चढउतार आले आहेत. परंतु काँग्रेस पक्ष संपला नाही, चार हजार किलोमीटर पदयात्रा करण्याचे काम राहुल गांधीनी केलं. बहुजन समाज कसा विस्कटेल हे भाजप काम करत असल्याचे पाटील म्हणाले.
आपल्याला खचून चालणार नाही
आपल्याला खचून चालणार नाही. लढाई आपली असल्याचे ते म्हणाले. शक्तिपीठ महामार्गाचा अट्टाहास सुरु आहे, पण शक्तिपीठवरून सत्तेतील आमदार भेटून तुमची भूमिका योग्य असल्याचे सांगत असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार वेगवेगळ्या दिशेला निघालं आहे. कुणाचा पायपोस कोणालाही नसल्याची स्थिती आहे. पाशवी बहुमत असल्याने एक माज या सरकारला आला असल्याचा हल्लाबोल सुद्धा पाटील यांनी केला.
अडचणी आल्यानंतर शेतकरी आत्महत्या करतोय
आपल्या राज्याच्या आर्थिक कारभार पाहिला, तर भविष्यात फटका बसणार आहे. शेतकरी अडचणी आल्यानंतर आत्महत्या करत आहे, पण आता कॉन्ट्रॅक्टरसारखा तरुण आत्महत्या करत असल्याचे ते म्हणाले. यावेळी खासदार शाहू महाराज, आमदार जयंत पाटील आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, सागर चव्हाण, राजेश लाटकर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.