नको राष्ट्रवादी, नको शिवसेना आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा; प्रदेशाध्यक्ष सपकाळांनीच दिले संकेत
नागपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर पुढे जाईल, असे स्पष्ट संकेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहेत. आगामी काळातील या निवडणुकीसाठी स्थानिक नेत्यांना सर्वाधिकार दिल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे महापालिका, जिल्हा परिषदा निवडणुकीत महाविकास आघाडी तुटलेली असेल, असे आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले, आगामी निवडणुकांसाठी स्थानिक नेते निर्णय घेतील. परंतु, सोबत येतील ते सहकारी असतील. याबाबत आधीच तसे कळविले आहे. महाराष्ट्रामध्ये विशिष्ट व्यासपीठावर एकत्र येण्याची संस्कृती आहे. मागील काळात भाजपचा जो अहंकार होता, त्यातून एकत्रित व्यासपीठावर येताना राजकारण केलं जात आहे. यामुळे दोन्ही राष्ट्रवादी व दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याविषयी तेच निर्णय घेतील. त्यांच्या पक्षाचा निर्णय काय, हा त्यांचा विषय आहे. प्रहारचे बच्चू कडू यांचे उपोषण किती दिवस चालते, हे देखील पाहणे आता गरजेचे आहे.
दरम्यान, मतांवर डल्ला मारला, त्याचे सूत्रधार हे कुलकर्णी आहेत. संध्याकाळी सहानंतर 74 लाख मतदान कसं वाढलं? हे ओपन सिक्रेट आहे. त्यामुळे कार्यरत किरण कुलकर्णी असल्यामुळे त्यांची नार्को टेस्ट व्हावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली.
राहुल गांधींकडून निवडणूक आयोगाच्या एकूणच प्रक्रियेवर शंका
“लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आजपर्यंत ज्या मुद्द्यांची मांडणी केली ते काळाच्या कसोटीवर खरे ठरले आहेत. चीनचा भारताला धोका आहे असा इशारा दिला होता, आता चिनी ड्रॅगन भारताला विळखा घालत आहे. नोटबंदीचा अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल GDP कमी होईल असे सांगितले, ते खरे ठरले. कोरोनामुळे मोठा धोका असल्याचा इशारा दिला होता. पण भाजप सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले, त्याचे गंभीर परिणाम भारताला आज भोगावे लागत आहेत. आताही निवडणूक आयोगाच्या एकूणच प्रक्रियेवर शंका उपस्थित होत आहे.