Congress Rajasthan former CM Ashok Gehlot reacts on Hindi-Marathi controversy in Maharashtra
जयपूर : महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध हिंदी असा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी आधी अनिवार्य आणि त्यानंतर पर्यायी म्हणून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावरुन जोरदार वाद निर्माण झाला. मनसे नेते राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी यावरुन जोरदार विरोध केला. यावरुन राजकीय गदारोळ झाल्यानंतर राज्य सरकारने दोन्ही जीआर रद्द केले. यावर आता राजस्थानचे माजी मुख्यमंत्री मराठी-हिंदी वादावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या मुद्द्यावरुन राजकारण करणाऱ्या नेत्यांना सल्ला देखील दिला आहे. अप्रत्यक्षपणे उद्धव आणि राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.
जयपूरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “भारत हा विविधतेने भरलेला देश आहे, जिथे भाषा, धर्म आणि संस्कृतीशी संबंधित प्रश्न वेळोवेळी उद्भवत राहतात. पण हे वाद काही नवीन किंवा मोठी गोष्ट नाहीत. त्यांचा असा विश्वास आहे की अशा सामाजिक समस्यांमधूनही उपाय निघतात आणि देश पुढे जातो.” असे मत त्यांनी व्यक्त केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे गेहलोत म्हणाले की, “भारताची सर्वात मोठी ताकद त्याची विविधता आहे. येथे एकता तेव्हाच मजबूत होते जेव्हा लोकांना त्यांच्यातील मतभेद असूनही एकत्र कसे राहायचे हे माहित असते. त्यांनी मराठी-हिंदी वादाला फार गंभीर मानले नाही आणि असे म्हटले की अशा चर्चा होत राहतात, परंतु राजकारण किंवा हिंसाचारापेक्षा संवाद आणि समजूतदारपणाचा मार्ग स्वीकारणे महत्त्वाचे आहे,” अशी प्रतिक्रिया अशोक गेहलोत यांनी महाराष्ट्रातील हिंदी मराठी वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अशोक गेहलोत पुढे म्हणाले, “प्रत्येक भाषा आणि समुदायाचे स्वतःचे हितसंबंध आणि अजेंडा असतो. काही लोक याला राजकीय रंग देतात, तर काही लोक याला सामाजिक वाद बनवतात. पण आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की हे सर्व भारताच्या लोकशाही आणि विविधतेचा भाग आहे. त्यांनी लोकांना भाषेला वादाचे नव्हे तर संवादाचे माध्यम बनवण्याचे आणि एकमेकांच्या सांस्कृतिक ओळखीचा आदर करण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी राजकारण्यांना जबाबदारीने विधाने करण्याचा सल्ला दिला आणि भाषेच्या नावाखाली हिंसाचाराला स्थान नसावे असे देखील मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी व्यक्त केले आहे.