भाजप खासदार कंगना राणौत हिने राज्यातील मराठी हिंदी वादावर प्रतिक्रिया दिली आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये सध्या हिंदी विरुद्ध मराठी असा वाद निर्माण झाला आहे. हिंदी भाषा प्राथमिक शाळांमध्ये पर्यायी भाषा म्हणून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावरुन मनसे नेते राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांना शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी देखील पाठिंबा दिला. दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्रित विजयी सभा देखील पार पडली. यानंतर महायुतीच्या नेत्यांनी टीकास्त्र डागले आहे. यावर आता बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत हिने प्रतिक्रिया दिली आहे.
भाजप खासदार कंगना राणौत हिने महाराष्ट्रामध्ये सुरु असलेल्या हिंदी मराठी वादावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने हा वाद योग्य नसल्याचे देखील म्हटले आहे. कंगना म्हणाली की, महाराष्ट्रामधील लोकांमध्ये भाषेवरुन वाद निर्माण व्हायला नको. लोकांमध्ये फूट पडायला नको. आपल्या देशातले लोक एकमेकांशी वेगवेगळ्या मागनि एकमेकांना जोडू पाहात आहेत. अशा प्रकारच्या घटना घडल्या तर लोक एकोप्याने कसे राहणार? भाषेचा वाद झाल्याने लोकांमध्ये अशा प्रकारे फूट पडत असेल तर कसं चालेल? अनेक लोक पर्यटनासाठी विविध भागांमध्ये जात असतात. अनेकांना विविध भाषा येतात, अनेकांना येत नाही. मग तेव्हा काय त्यांना मारहाण केली जाणार का? आपल्या देशाचा एकोपा कायम राहिला पाहिजे, अशी भूमिका भाजप खासदार कंगना राणौत हिने घेतली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्या म्हणाल्या की, “भाषा असो किंवा कुठलीही गोष्ट जर देशाचं विभाजन करत असेल तर अशा गोष्टीपासून लांब ठेवले पाहिजेत. आपण परस्परांमध्ये एकोपा ठेवून आहोत. मात्र अशा प्रकारच्या घटना घडल्या की त्या सगळ्या एकोप्यावरुन लोकांचा विश्वास उडू शकतो. हा कुणाला वाटण्याचा विषय नाही,” असं कंगनाने म्हटले आहे. एका वाहिनीशी बोलताना कंगना राणौत हिने प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्यामध्ये पहिली ते चौथी शाळांमध्ये हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली. मात्र याला राज्यातून तीव्र विरोध करण्यात आला. यानंतर अनिवार्य शब्द काढून टाकून पर्यायी भाषा म्हणून हिंदी भाषा ठेवण्यात आली. याचा शासन आदेश देखील काढण्यात आला. यानंतर मनसे पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटाने तीव्र विरोधी भूमिका घेतली. या निर्णयाच्या विरोधात मनसे आणि ठाकरे गटाने मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्रित आले. तब्बल दोन दशकांनंतर हे ठाकरे बंधू एकत्रित आले. निर्णय रद्द करण्यात आला असला तरी देखील ठाकरे बंधूंनी एकत्रित विजयी सभा घेतली. यामधून दोन्ही नेत्यांनी भाषा लादण्यावरुन महाराष्ट्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आता हिंदी भाषा शाळांमध्ये शिकवण्याबाबत काय निर्णय घेतला जाणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.