
कुरुंदवाड नगरपरिषदेच्या निवडणुकीत येणार रंगत; नगराध्यक्षपदाची लढत 'तिरंगी' होणार
कुरुंदवाड : कुरुंदवाड नगरपरिषदेच्या निवडणुकीतील माघारीच्या अंतिम दिवशी मोठे राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्षपदाचे तीन उमेदवार आणि नगरसेवकपदाचे तब्बल ४० उमेदवार माघारी गेल्याने, आता नगराध्यक्षपदाची निवडणूक तिरंगी लढतीत होणार हे निश्चित झाले आहे. माघारीनंतर नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी एकूण ६१ उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे शहरातील राजकीय तापमान आता शिगेला पोहोचणार असून, सर्वच राजकीय पक्षांनी अंतिम निवडणूक रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.
माघारीनंतर नगरसेवक पदासाठी काँग्रेस २० उमेदवार, राजर्षी शाहू आघाडी २० उमेदवार, भाजप १६ उमेदवार, अपक्ष 5 उमेदवार असे एकूण ६१ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तर नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस, राजर्षी शाहू आघाडी आणि भाजप या तीन प्रमुख पॅनेलसह अपक्ष उमेदवार रिंगणात उतरल्याने प्रत्येक प्रभागात बहुरंगी लढतीची चिन्हे आहेत. अनेक ठिकाणी पक्षीय उमेदवारांसमोर अपक्ष उमेदवार कडवी टक्कर देतील, असे चित्र असल्याने अपक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. नगराध्यक्ष पदावर तिरंगी लढत निश्चित झाल्यामुळे आणि नगरसेवक पदासाठी बहुरंगी संघर्ष असल्याने प्रचारात मोठी आक्रमकता वाढणार आहे.
दरम्यान, मतदारांची मते विभागली जाण्याची शक्यता विचारात घेऊन सर्वच उमेदवारांनी आता संयोजन, संपर्क आणि मतदारांची ‘गट बांधणी’ यावर अधिक जोर देण्यास सुरुवात केली आहे. कुरुंदवाड पालिकेची निवडणूक आता केवळ पक्षीय लढतीपुरती मर्यादित न राहता, स्थानिक राजकीय समीकरणे अंतर्गत असंतोष आणि अपक्षांची सरशी यातील संघर्ष ठरणार आहे. आगामी काही दिवसांत प्रचाराचा धुरळा आणखी वाढेल आणि निवडणुकीचे वातावरण अधिक तापेल, अशी स्पष्ट चिन्हे आहेत.