'अर्धवट बुद्धी, खोटे आरोप..', अंजली दमानियांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर
बीड : राज्यामध्ये मागील दोन महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपरहण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, भाजप आमदार सुरेश धस आणि मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अंजली दमानिया यांनी पावणे तीनशे कोटींचा घोटाळ्याचा आरोप धनंजय मुंडेंवर केला आहे. यावरुन आता धनंजय मुंडे देखील आक्रमक झाले आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुरव्यानिशी राज्याच्या कृषी खात्यातील भ्रष्टाचाराची पोलखोल केली. महायुती सरकारमध्ये तत्त्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या घोटाळ्यांची मालिकाच सुरू होती, असा आरोप करत दमानिया यांनी थेट कागदपत्रेच माध्यमांसमोर सादर केली. एकामागून एक घोटाळ्यांची मालिका वाचून दाखवत त्यांनी कृषी खात्यातील घोटाळे समोर आणले. तसेच आता तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार की नाही, असा सवालही उपस्थित केला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अंजली दमानिया म्हणाल्या, “कापूस गोळा करण्यासाठी लागणाऱ्या बॅगा खरेदीपासून नॅनो डीएपी,बॅटरी स्पेअर, मेटाल्डे हाइड पर्यंत भ्रष्टाचार झाला आहे. पण तो किती पट झालाय, हे पाहिलं तर धक्का बसणार आहे. या सर्वांचे दर एकदा पाहा, नॅनो युरिआ आणि नॅनो डिएपी या इफको कंपनीच्या आहे. नॅनो युरियाचा एक लीटरचा दर 184 रुपये इतका आहे. म्हणजे 500 मिलीलीटर बॉटलला 500 रुपये मिळतात. पण धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली एक टेंडर काढण्यात आलं आणि ती बॉटल 220 रुपयात खरेदी करण्यात आली. बाजारात याची सिंगल बॉटल 92 रूपयांना मिळते. पण धनंजय मुंडे यांनी 19 लाख 68 हजार 408 बॉटल 220 रुपये दराने घेतल्या. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किमतीने या बॉटल्स खरेदी करण्यात आल्या,” असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अपडेट घ्या एका क्लिकवर
अंजली दमानिया यांच्या आरोपांवर मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे. त्याचबरोबर त्यांनी सोशल मीडिया पोस्ट देखील केली आहे. धनंजय मुंडे यांनी लिहिले आहे की, “अंजली दमानिया यांनी आज पुन्हा दिवसातून दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत माझ्यावर खोटे व बेछूट आरोप केले आहेत. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदीनुसार व मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अंतिम मान्यतेनंतरच झाली आहे, त्यानंतरच पुढील कार्यवाही सुरु झाली. यांसह इतर अनेक मोघम आरोप करणाऱ्या दमानिया ताई यांच्यावर मी लवकरच फौजदारी अब्रु नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार आहे,” असा स्पष्ट मत मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.