दिल्ली विधानसभेत कोणाचे सरकार येणार? (फोटो- टीम नवराष्ट्र)
दिल्ली विधानसभेची निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोचली आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे . तर शनिवारी म्हणजेच 8 तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यात मुख्य लढत होणार आहे. तर कॉँग्रेस देखील स्वबळावर दिल्लीची निवडणूक लढवत आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. सर्वांचे भवितव्य उद्या ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. मतदार कोणाला संधी देणार हे 8 तारखेला कळणारच आहे. मात्र दिल्लीच्या निवडणुकीत कोणते मुद्दे निर्णायक ठरणार हे जाणून घेऊयात.
मतदानाची टक्केवारी
दिल्लीत 2015 मध्ये 67.13 टक्के तर 2020 मध्ये 62. 59 टक्के मतदान झाले हते. दोन्ही वेळेस मतदान हे शनिवारी झाले होते. काही प्रमाणात मतदान कमी झाले असल्याची चर्चा होती. यावेळेस मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. मतदानांची टक्केवारी वाढल्यास कोणाला फायदा होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
विभाजित मतदान पद्धत
2004 च्या लोकसभा निवडणुकीनंतर मतांचे विभाजन पद्धती पहायला मिळाली. म्हणजेच मतदारांनी लोकसभेत एका पक्षाला तर विधानसभेत दुसऱ्या पक्षाला मतदान केले होते. कोणती निवडणूक आहे त्यावरून मतदान करतात असे दिसून आले आहे. यामध्ये कोणत्याही पक्षाशी संबंधित नसलेले मतदार देखील असतात. दिल्लीत अरविंद केजरीवाल आणि नरेंद्र मोदी या दोघांच्या बाजूने मतदान करणारे मतदार आहेत.
चेहरा
प्रत्येक निवडणुकीत त्या-त्या पक्षाचा चेहरा कोण असणार यावर देखील निवडणुकीचा निकाल अपेक्षित असतो. आम आदमी पक्षाकडे अरविंद केजरीवाल तर भाजपकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक दोघांसाठी महत्वाची समजली जात आहे.
पक्षाचे कार्यकर्ते
प्रत्येक निवडणुकीत मिळणारे यश हे त्या पक्षांच्या कार्यकर्त्यांवर अवलंबून असते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने भाजपने हरयाणा आणि महाराष्ट्रात अभूतपूर्व यश संपादन केले आहे. दिल्ली विधानसभेसाठी देखील संघाने अविरत मेहनत घेतली असल्याचे म्हटले जात आहे. भाजपने 50 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र त्यांच्यासमोर असणारे आम आदमी पक्षाचे आव्हान देखील तितकेच तगडे असणार आहे.
हेही वाचा: पुन्हा CM होण्याचे केजरीवालांचे स्वप्न भंगणार? आप अन् भाजपला किती जागा मिळणार? पहा अंदाज
काल दिल्ली विधानसभेचा प्रचार संपला आहे. त्यानंतर नवी दिल्ली येथे कोण जिंकणार याबद्दल फलोदी सट्टा बाजारात एक अंदाज मांडण्यात आला आहे. नवी दिल्ली मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे निवडणूक लढवत आहेत. तर भाजपकडून प्रवेश वर्मा आणि कॉँग्रेसकडून संदीप दीक्षित हे निवडणूक लढवत आहेत. संदीप दीक्षित हे माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचे पुत्र आहेत.
मतदानाआधीचा अंदाज काय?
यंदाची दिल्लीची विधानसभा निवडणूक आम आदमी पक्षासाठी कठीणच जाऊ शकते असे म्हटले जात आहे. यंदाची निवडणूक भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात लढवत आहे. ज्यामुळे आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. फलोदी सट्टा बाजारच्या नव्या अंदाजानुसार, दिल्ली विधानसभेत भाजपला 34 ते 36 जागा मिळू शकतात. तर आम आदमी पार्टीला देखील 34 ते 36 जागांवर विजय मिळू शकतो. म्हणजेच यंदा दोघांमध्ये जोरदार लढत होताना पाहायला मिळू शकते.
या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा ही नवी दिल्लीच्या जागेची होत आहे. या जागेवर आपला विजय होणार असा विश्वास संदीप दीक्षित यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान फलोदी सट्टाबाजारच्या नवीन अंदाजानुसार, या ठिकाणी केजरीवाल यांना धक्का बसू शकतो. तसेच भाजपचे प्रवेश वर्मा हे विजयी होऊ शकतात.
काय आहे दिल्लीच्या जनतेचा मूड?
सी-वोटरने दिल्लीच्या जनतेला सरकार बदलायचे आहे का? अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले होते. 1 फेब्रुवारीपर्यंत घेतलेल्या अंदाजानुसार 43.9 टक्के जनता ही सध्याच्या सरकारच्या कामावर नाराज आहे. तसेच त्यांना यावलेस सत्ता बदल हवा आहे, असे जनतेचे मत दिसून आले. 10 ते 11 टक्के जनता नाराज आहे पण त्यांना सरकार बदलण्यात रस दिसून येत नाहीये. तसेच 38.3 टक्के नाराज नसून, त्यांना सरकार बदलायचे नाही असे त्यांचा मूड आहे. सरकार बदलायचे आहे बदलायचे नाही यामध्ये समान टक्केवारी पाहायला मिळत आहे. त्यामुळे दिल्लीची जनता नक्की कोणाला साथ देणार हे 8 तारखेलाच स्पष्ट होणार आहे.