
सत्ता गेली तरीही तासगाव नगरपालिकेत लागला आर. आर. आबांचा फोटो
तासगाव : तासगाव नगरपालिकेत स्वाभिमानी विकास आघाडीने नगराध्यक्षपदासह १३ जागांवर विजय मिळवून सत्ता स्थापन केली. माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या उपस्थितीत नूतन नगराध्यक्षा विजया बाबासो पाटील व नवनिर्वाचित नगरसेवकांनी शुक्रवार (दि. २६) रोजी नगरपालिकेत पदभार स्वीकारला.
पदभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष दालनात छत्रपती शिवाजी महाराज व माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रतिमा लावण्यात आल्याचे दिसून आले. मात्र, स्व. आर. आर. पाटील यांची प्रतिमा नसल्याचे लक्षात येताच संजयकाका पाटील यांनी नूतन नगराध्यक्षा यांचे पती व माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांना त्यांच्या प्रतिमाही दालनात लावण्याचे निर्देश दिले. त्यानुसार कार्यकर्त्यांना तातडीने प्रतिमा आणण्यास सांगण्यात आले आणि काही वेळातच स्व. आर. आर. पाटील यांची प्रतिमा दालनात लावण्यात आली.
यावेळी संजयकाका पाटील म्हणाले, स्व. आर. आर. पाटील यांनी राज्यात तासगावचे नेतृत्व केले. मतदारसंघाच्या विकासात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे नगराध्यक्ष दालनात त्यांची प्रतिमा असणे आवश्यक आहे. नगरपालिकेचे काम सर्वांना सोबत घेऊन विकासात्मक दृष्टीकोनातून व्हावे.
विरोधी गटातील असलेल्या नेतृत्वाची प्रतिमा दालनात लावण्यात आल्याने नगरपालिकेतील वातावरणात चर्चा झाली. यापूर्वीही नगरपालिकेच्या नूतन इमारतीतील सभागृहास स्वतःचे नाव देण्याचा ठराव असताना त्यांनी ते नाव न देता ‘सर्कससिंह कै. परशुराम माळी’ यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता.या पार्श्वभूमीवर नव्या सत्ताकारणात भूमिका व दिशा याबाबत शहरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
विकासाभिमुख कामकाजाची अपेक्षा
नगराध्यक्ष दालनात स्व. आर. आर. पाटील यांची प्रतिमा लावण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. शहराच्या जडणघडणीत योगदान दिलेल्या नेत्यांचा सन्मान जपला जात असल्याची भावना व्यक्त होत असून, नव्या नगरपालिकेकडून विकासाभिमुख कामकाजाची अपेक्षा नागरिक करत आहेत.
मतभेद कुठे थांबवायचे?
निवडणूक संपल्यानंतर राजकीय मतभेद थांबवून शहराच्या हितासाठी एकत्र काम करण्याची वेळ असते, असा संदेश या घटनेतून मिळतो. सत्तेच्या राजकारणापेक्षा कर्तव्य आणि जबाबदारी महत्त्वाची ठरते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : शरद पवारांच्या NDA प्रवेशाच्या चर्चांवर बावनकुळेंचे मोठं विधान; म्हणाले, ‘भाजप हायकमांड निर्णय…’