नवी दिल्ली: सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनात भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यात आली. संरक्षणमंत्रीण राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली. त्यानंतर विरोधकांकडून राहुल गांधी,अरविंद सावंत, गौरव गोगोई यांनी देखील भाष्य केले आहे. दरम्यान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ऑपरेशन सिंदूरदरम्यान काय काय घडले हे सांगितले. तसेच अमेरिकेने मध्यस्थी केली हा ट्रम्प यांचा दावा त्यांनी मोडून काढला.
संसदेत बोलताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले, ” २२ मे ते १७ जून या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कोणताही फोन कॉल झालेला नाही. ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन आला होता. यावेळी त्यांनी पाकिस्तान मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. ज्यावर पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानने हल्ला केल्यास भारत त्याला चोख प्रत्युत्तर देईल असे सांगितले.”
“पाकिस्तानने ९ आणि १० मे रोजी केलेल्या हल्ले भारताने यशस्वीपणे परतवून लावले. पाकिस्तान सीजफायरसाठी तयार असल्याने अनेक देशानी १० मे रोजी फोन करून भारताला सांगितले. मात्र युद्धविरामाबाबत बोलायचे असल्यास भारताच्या डीजीएमओशी संपर्क साधावा असे भारताने स्पष्ट केले. अमेरिकेसोबत झालेल्या संभाषणात व्यापारासंदर्भात कोणताही मुद्दा नव्हता, असे जयशंकर म्हणाले.
एस. जयशंकर यांच्या या मुद्द्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना सुनावले. विरोधक आपल्याच परराष्ट्र मंत्र्यांवर विश्वास ठेवत नाही पण दुसऱ्या देशावर ठेवतात, असे अमित शहा म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरवरून राहुल गांधी-राजनाथ सिंह आमने-सामने
“आम्ही दशतवादाला मुळापासून संपवण्याचा निर्धार केला आहे. आम्ही राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे उध्वस्त केले आहेत. १०० पेक्षा जास्त दहशतवादी आणि हँडलर्स मारले गेले. भारत कोणत्याही अवस्त्र युद्धाच्या भीतीला भीक घालणार नाही. दहशतवादाचा बिमोड केला जाणारच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्य दलांना कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. पहलगाममधील हल्ल्यात धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या. हे घृणास्पद आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.
“मग तुम्ही का…?” ऑपरेशन सिंदूरवरून राहुल गांधी-राजनाथ सिंह आमने-सामने; संसदेत गदारोळ
संसदेत सीजफायरवर चर्चा सुरु असताना राहुल गांधी आणि राजनाथ सिंह यांच्यात थोडासा वादविवाद झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय लष्कराने जेव्हा शत्रू राष्ट्राच्या सैन्य ठिकाणांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली तेव्हा, पाकिस्तानने हार स्वीकारली होती. त्यानंतर पाकिस्तानने सीजफायरची मागणी केली, असे राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितले. यावर राहुल गांधी यांनी मग तुम्ही ऑपरेशन थांबवले का? असा सवाल उपस्थित केला. त्यांच्या या प्रश्नाने विरोधकांनी संसदेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.