
भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे निधन; अक्कलकोट तालुक्यात शोककळा
सोलापूर : अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सहकार क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे सिद्रामप्पा पाटील (वय ८८) यांचे गुरुवारी रात्री सोलापूर येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने अक्कलकोट तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी तीन वाजता कुमठे (ता. अक्कलकोट) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भाजप नेते, तसेच सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली.
सिद्रामप्पा पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून अक्कलकोट तालुक्यात भाजपाचा पाया भक्कम केला. संघटनात्मक उभारणी, शेतकरी आणि सहकार क्षेत्रातील कार्य, तसेच ग्रामीण विकासासाठी केलेले योगदान मोठे होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणारे, प्रामाणिक आणि तळमळीचे नेतृत्व अशा शब्दांत त्यांचे स्मरण करण्यात येत आहे. त्यांचा राजकीय प्रवास अत्यंत प्रेरणादायी होता. गावच्या सरपंचपदापासून सुरुवात करून पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, सोलापूर जिल्हा बँकेचे सलग ३५ वर्ष संचालक (एकवेळ उपाध्यक्ष), श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, मार्केट कमिटी सभापती आणि अखेर अक्कलकोटचे आमदार अशा विविध पदांवर त्यांनी कार्य केले.
अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक आणि पक्षनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जात. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. उपचारासाठी त्यांना सोलापूरमधील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र, गुरुवारी रात्री ८ वाजून १७ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिद्रामप्पा पाटील यांच्या जाण्याने अक्कलकोट तालुक्याने एक खंबीर, प्रामाणिक आणि जनहिताची जाण असलेले नेतृत्व गमावले आहे.