शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; हा बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश
नाशिक : स्थायी समितीचे माजी सभापती व शरद पवार गटाचे नेते गणेश गिते यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे. येत्या रविवारी नाशकातच जोरदार शक्तिप्रदर्शन करत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे गिते यांनी ‘नवराष्ट्र’शी बोलताना सांगितले. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने गणेश गिते यांचा भाजप प्रवेश महत्वाचा मानला जात आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपकडून इच्छुक असलेले गिते यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी शरद पवार गटाकडून नाशिक पूर्व मतदारसंघातून उमेदवारी केली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. मूळ भाजपचे व त्यातल्या त्यात मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे गिते यांनी निवडणुकीनंतर शरद पवार गटाची फारकत घेत, भाजप प्रवेशासाठी प्रयत्न चालवले होते. परंतु, भाजपातील एका गटाने त्यांना विरोध केला. परिणामी, ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांच्याबरोबरच त्यांचा होणारा भाजप प्रवेशाचा मुहूर्त हुकला होता.
तथापि, अन्य पक्षातून भाजपात येणाऱ्यांचे स्वागत करण्याचा निर्णय भाजप पक्षश्रेष्ठींनी घेतल्यामुळे गिते यांच्या प्रवेशाला होणारा विरोध मावळला आहे. त्यामुळे येत्या रविवारी नाशकात गणेश गिते यांच्यासह त्यांचे शेकडो समर्थक भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रवेशासाठी कोण असेल याची माहिती उपलब्ध झाली नसली तरी, मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश असेल असा अंदाज आहे.
असंख्य कार्यकर्त्यांसह करणार प्रवेश
भाजपात प्रवेश करण्याचे निश्चित झाले आहे. विधिमंडळाच्या अधिवेशापूर्वी व 30 जूनपूर्वी नाशकातच माझा प्रवेश होईल. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून तसे संकेत मिळाले आहेत. आपल्यासोबत असंख्य कार्यकर्ते असतील, असे गणेश गिते यांनी म्हटले आहे.