
गणेश नाईकांचे एकनाथ शिंदे यांना पुन्हा उघड आव्हान ...तर नामोनिशाण साफ करेन !
ठाणे : नवी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांना खात्री होती की आपण जसे युद्ध जिंकले तसेच तहात देखील जिंकू. त्यामुळेच नवी मुंबई महापालिकेवर एक हाती भाजपचा झेंडा फडकला. ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर येथे देखील भाजपचे महापौर बसले असते. मात्र, नवी मुंबईत जशी आम्ही कारागिरी केली, तशी ठाणे आणि कल्याण डोंबिवलीतील नेत्यांना करता आली नाही, असे भाजपमधील स्वपक्षीयांना खडेबोल वनमंत्री व ठाणे जिल्ह्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी सुनावले.
तसेच आताही जरी भाजपने मला परवानगी दिली तरी यांचे नामोनिशाण साफ करून दाखवेन, असा उघड गर्भित इशारा नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर येथील भाजप कार्यकर्त्यांनी बरेच काही सहन केले आहे, असे सांगत येथील भाजप कार्यकर्ते खुश नाहीत, अशी जाहीर कबुली देत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कामगिरीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
ठाण्यातील वंदे मातरम् संघाने आयोजित केलेल्या माघी गणपती उत्सवासाठी दर्शनासाठी वनमंत्री गणेश नाईक हे ठाण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना मुक्त संवाद साधला. गणेश नाईक म्हणाले की, गेली २५ वर्ष नवी मुंबई महापालिकेवर आमची सत्ता आहे. सुरुवातीला पाच वर्षे मी शिवसेनेबरोबर होतो तेव्हा नवी मुंबई महापालिकेत पाच वर्षे शिवसेनेची सत्ता होती. त्यानंतरची वीस वर्ष मी राष्ट्रवादीमध्ये होतो, तेव्हा नवी मुंबईत राष्ट्रवादीची एक हाती सत्ता होती. आता मी भाजपमध्ये आलो तर भाजपची सत्ता आणली.
नवी मुंबईत त्यांना व्हायचे होते, ‘मोठा भाऊ’
माझी आणि भाजपच्या येथील स्थानिक नेत्यांची अशी इच्छा होती की, एमएमआर क्षेत्रातील महापालिकांमध्ये भाजपाने स्वतंत्र लढावे. ज्याप्रमाणे नेत्यांची इच्छा असते खासदार, आमदार, मंत्री होण्याची. त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांची देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नगरसेवक, महापौर, स्थायी समिती सभापती अशी विविध पदे मिळण्याची इच्छा असते. त्यामुळे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे स्वबळाचा आग्रह धरला होता. ठाणे आणि कल्याण डोंबिवलीप्रमाणेच नवी मुंबईतही शिवसेनेला आमच्यापेक्षा अधिक जागा लढवायच्या होत्या. म्हणजे त्यांना मोठा भाऊ व्हायचे होते, असे ते म्हणाले.