
Eknath Shinde on Mahabaleshwar News:
Mahabaleshwar News: शिवसेना हा शब्द पाळणारा पक्ष आहे. जो शब्द बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी दिला. तोच वारसा मी पुढे चालवत आहे. या भागातील तरुणांना रोजगारासाठी मुंबई-पुण्याकडे वणवण करावी लागू नये, या साठी वाडा कुंभरोशी भागात १० हजार तरुणांना रोजगार देणारा मोठा उद्योग प्रकल्प आम्ही तातडीने उभा करणार आहोत, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
वाडा कुंभरोशी येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर माजी आमदार दगड सपकाळ, शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित भोसले, माजी जिल्हा प्रमुख नंदकुमार घाडगे, चंद्रकांत पाटील, रेश्मा जगताप, सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शरद कणसे आदी उपस्थित होते. या सभेत पंचायत समितीचे दिवंगत माजी सभापती धोंडिबा जाधव यांचे चिरंजीव संतोष जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नोकरीसाठी बाहेर गेलेला इथला तरुण पुन्हा गावात आला पाहिजे, हा माझा संकल्प आहे. सातारा एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध नसल्यास, वाडा कुंभरोशी परिसरात आम्ही जागा देऊ आणि तिथे मोठा कारखाना उभा करू. यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली असून, १० हजार हातांना काम देणारे इंडस्ट्री सेंटर येथे उभे राहील. याशिवाय, जावली येथे प्रस्तावित असलेल्या १५ हजार कोटींच्या हायड्रो प्रोजेक्टमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रतापगड ते तापोळा व्हाया शिरवली दरम्यानचा रस्ता सध्या छोटा असून, पर्यटकांच्या सोयीसाठी तो दोन पदरी (Two-lane) करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बिरवाडी ते हातलोट आणि कोकण ते दुधगाव-मांघर हा रस्ता पूर्ण केल्यामुळे कोयना खोऱ्यातील अतिदुर्गम गावांचा संपर्क राज्यातील मुख्य शहरांशी थेट जोडला जाईल. २२ गावांचे पालकत्व स्वीकारून तिथे शुद्ध पाणी, रस्ते आणि शाळा यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. (Satara News)
Anjali Wagh on Amruta Fadnavis : गायिका अंजली वाघची जीभ घसरली; अमृता फडणवीसांबाबत केले आक्षेपार्ह
महाबळेश्वर येथे बौद्ध समाजाच्या अस्मितेचे प्रतीक असलेले ‘संविधान भवन’ उभारण्यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल, सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, प्रतापगड किल्ल्यासाठी १७० कोटींचा निधी दिला आहे. या भागाचे ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून ब्रँडिंग करण्याची घोषणा करत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, परदेशात जाण्या ऐवजी पर्यटकांनी इथल्या कोयना धरणाच्या बॅकवॉटर आणि दऱ्याखोऱ्यांचा आनंद घ्यावा. यासाठी ‘टेंट सिटी’ आणि ‘होम स्टे’ (Home Stay) संकल्पनेला बळ दिले जाईल, ज्यामुळे स्थानिकांना पर्यटनातून मोठी कमाई होईल, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.
मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षे पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र फिरलो. अडीच तासही शांत झोपलो नसेल. लाडक्या बहिणींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. अडीच वर्षांत शिवसेना (शिंदे गट) दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून, गद्दारीचे आरोप करणाऱ्यांना जनतेनेच घरचा रस्ता दाखवला आहे, असा टोला त्यांनी लगावला.