Sanjay Raut Marathi News: विधानसभा निवडणुकीनंतर आगामी राजकारण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ऑपरेशन टायगर सुरू केले आहे. ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी आणि नेते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. मंत्री उदय सामंत यांनी दावोस दौऱ्यात ‘ऑपरेशन टायगर’ची घोषणा केली होती. शिवसेनेत एकामागून एक प्रवेश होत जुने सहकारी आपल्यासोबत येतील, असा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर काही दिवसांतच रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश करत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला.
त्यामुळे शिवसेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’ची महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. यावरुनच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर जोरदार टीका केली आहे. फक्त दोन तासांसाठी ईडी आणि सीबीआय आमच्या हातात द्या, अमित शाह सुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील, असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चढवला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, “कसलं ऑपरेशन टायगर? आज त्यांच्याकडं सत्ता आहे. त्यामुळे त्यांना सत्तेची मस्ती चढलीय. आम्हीही सत्ता भोगलेली आहे. परंतु, सत्तेचा माज आणि अशी विकृती केलेली नाही. सत्ता आणि यंत्रणा असल्यामुळं ते दुसऱ्यांवर दबाव टाकत आहेत. परंतु, फक्त दोन तास ईडी आमच्या ताब्यात द्या. मग अमित शाहसुद्धा आमच्या पक्षात येतील की नाही ते बघा. दोन तास ही सर्व यंत्रणा आमच्या हातात असेल तर बावनकुळेंपासून सगळेच नेते मातोश्रीवर येऊन आमच्या पक्षात प्रवेश करतील,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत यांनी यावेळी दिल्लीतील चेंगराचेंगरीवरूनही हल्ला चढवला. मृतांचा सरकारी आकडा 30 आहे. माझ्या माहिती प्रमाणे किमान 120 ते 150 लोक चेंगराचेंगरीत मरण पावले आहेत. सरकार आकडा लपवत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. महाकुंभला जाण्यासाठी भाजपकडून ज्या पद्धतीने निमंत्रण दिलं जात आहे, जणू हा भाजपचाच सोहळा आहे. काल 50 कोटी लोक आले हे योगी सांगत होते. पण मेले किती सांगा? चेंगराचेंगरीत किती मरण पावले? 7 हजाराच्यावर लोकं बेपत्ता आहेत. कुठे गेले 7 हजार लोक.
लोकांना भ्रमित केलं जातंय. तुम्ही फक्त या, तुमच्यासाठी गाड्या, घोडे, जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था असल्याचं सांगितलं जातंय. पण प्रत्यक्षात तिथे असं काही नाही. इतकी अव्यवस्था कोणत्याच कुंभात झाली नव्हती, असेही राऊत यांनी म्हटले.