महाविकास आघाडीत 'या' महत्त्वपूर्ण मुद्यावरून उभी फूट; काँग्रेसचा ठाकरेंच्या शिवसेनेला विरोध (सोजन्य - सोशल मिडीया)
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. 50 जागाही या तिन्ही पक्षांना जिंकता आल्या नाहीत. त्यानंतर या महविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे वेळोवेळी पाहिला मिळाले. तरीही वरवर आघाडी टिकून आहे. मात्र, विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) पक्षांमध्ये मतभेद उफाळण्याची शक्यता आहे.
सध्या उद्धव ठाकरे गटाचे अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. परंतु, त्यांची मुदत येत्या ऑगस्टमध्ये संपत आहे. त्यामुळे या पदावर दावा करण्याची काँग्रेसने तयारी सुरू केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सध्या काँग्रेसकडे विधान परिषदेत सर्वाधिक आठ सदस्य आहेत, तर ठाकरे गटाकडे सात आणि शरद पवार गटाकडे दोन सदस्य आहेत. त्यामुळे संख्याबळाच्या आधारे काँग्रेसने हे पद मागितले आहे.
विधानसभेतील स्थिती आणि काँग्रेसचा तर्क
विधानसभेत महाविकास आघाडीतील सर्वाधिक आमदार शिवसेना (उबाठा) पक्षाकडे आहेत. ठाकरे गटाचे 20, काँग्रेसचे 16 आणि शरद पवार गटाचे 10 आमदार आहेत. त्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मिळू शकते, असा अंदाज आहे. जर विधानसभेत ठाकरे गटाला विरोधी पक्षनेते पद मिळाले, तर विधान परिषदेमध्ये काँग्रेसने हे पद मागणे स्वाभाविक असल्याचा काँग्रेसचा युक्तिवाद आहे.
आघाडीत तणाव वाढणार?
विरोधी पक्षनेते पदावरुन ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चर्चेचे सत्र सुरू असल्याची माहिती मिळत आहे. यावर अंतिम निर्णय अजून झालेला नाही. मात्र, काँग्रेसने ठाम भूमिका घेतल्यास महाविकास आघाडीतील तणाव वाढू शकतो.
विधान परिषद सदस्यसंख्या आणि निवड प्रक्रिया
३० सदस्य हे विधानसभा सदस्यांमार्फत निवडले जातात. २२ सदस्य विविध स्थानिक प्राधिकरणांमार्फत निवडले जातात. ७ सदस्य पदवीधर मतदारसंघांमधून निवडून येतात. ७ सदस्य शिक्षक मतदारसंघांमधून निवडले जातात. १२ सदस्यांची नियुक्त्ती राज्यपालांकडून केली जाते.