dcm ajit pawar on inauguration of pune metro
पुणे : पुणे मेट्रोचे जाळे वाढले आहे. सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मार्गाचा लोकार्पण अखेर पार पडत आहे. दोन दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर येणार होते. मात्र शहराला ऑरेंज अलर्ट आणि मुसळधार पावसामुळे मोदींचा हा दौरा रद्द करण्यात आला. ऐनवेळी हा पंतप्रधानांचा दौरा रद्द झाल्यामुळे मेट्रो तयार असून सुरु करण्यात आली नव्हती. आज (दि.29) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाईन स्वरुपामध्ये पुणे मेट्रोचे उद्घाटन करणार आहेत. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यामध्ये दाखल झाले आहेत. गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडत आहे. पुण्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये भावना व्यक्त केल्या आहेत.
पुणे मेट्रो उद्घाटन सोहळ्यावेळी भाषण देताना पालकमंत्री अजित पवार म्हणाले, पुण्यासारख्या ऐतिहासिक शहरामध्ये विविध विकासांकामांची उद्घाटन आणि भूमिपूजन होत आहेत. पंतप्रधान मोदी हे आता पुणे मेट्रोचे उद्घाटन करणार आहेत. 26 तारखेला होणार होता मात्र खूप पाऊस असल्याचे पंतप्रधानांनी पाहिले. खरंतर पुणेकरांना त्रास होऊ नये आणि शहराला रेड अलर्ट असल्यामुळे शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली होती. आदल्या दिवशी शहरामध्ये एवढी मोठी वाहतूक कोंडी झाली. पावसांचं पाणी जागोजागी साचलं. त्यामुळे पावसामुळे पुणेकरांची अडचण होत असताना मी आल्यानंतर अजून ट्राफिकची अडचणी व्हायला नको, म्हणून त्यांनी हा कार्यक्रम पुढे ढकलला, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.
हे देखील वाचा : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी केलं मोठं विधान; म्हणाले, ‘ही योजना कधीही…
त्यानंतर शरद पवार गटाचे आक्रमक होऊन शहरामध्ये आंदोलन करत होते. महाविकास आघाडीला खडेबोल सुनावताना अजित पवार म्हणाले की, विरोधकांना कुठे काय बोलवं आणि काय बोलू नये हे काही कळत नाही. काही तरी वेडवाकड सांगून हा कार्यक्रम पुढे ढकलला असं सांगितलं. पण वास्तविक लवकरच आपल्या राज्यामध्ये आचारसंहिता सुरु होणार आहे. त्यामुळे जेवढे काही कार्यक्रम लवकर असतील तेवढे होणार आहे. टर्मिनलचा कार्यक्रम पुणेकरांना सोयीचा व्हावा यासाठी पंतप्रधानांनी 2 महिने लवकर घेतला. पण नागरिकांना वाटतं की पंतप्रधानांनी वेळ दिला नाही म्हणून कार्यक्रम होत नाही. तर तसं नसतं, असे परखड मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
पुढे त्यांनी पुणे मेट्रोचे कौतुक केले. वाढत्या मार्गाबद्दल अजित पवार म्हणाले की, सेशन कोर्टपासून आता मेट्रो तीन स्टेशन पार करुन स्वारगेटला येणार आहे. स्वारगेटचं मेट्रो स्टेशन लोकांनी नक्की पाहावं. ते पाहून आपल्याला अभिमान वाटेल. सहकऱ्यांनी पुणेकरांना नावाला साजेस असं काम उभं केलं आहे. सगळी मेट्रो ही अंडरग्राऊंड व्हावी असा विचार केला जात होता. मात्र त्यामुळे खर्च एवढा वाढत होता की, त्यामुळे नाईलाजस्तव आपण कोर्ट ते स्वारगेट आणि स्वारगेट ते कात्रज अशी अंडर ग्राऊंड मेट्रो करत आहोत. हे सगळे महत्त्वाचे टप्पे पार पडत असताना पंतप्रधानांनी लक्ष घालत विविध मेट्रो स्टेशनचं उद्घाटन केलं, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.
पुणेकरांची सहनशीलता जवळपास संपत आलेली
पुण्यातील वाहतूक कोंडी हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. यावरुन अजित पवार यांनी पालकमंत्री म्हणून दिलगिरी व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या. अजित पवार म्हणाले की, पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील जो पर्यंत सार्वजनिक वाहतूक चांगल्यातील चांगली करता येणार नाही, तोपर्यंत पुणेकरांना वाहतूक कोंडीतून सोडवता येणार नाही. आणि म्हणून काही भागांमध्ये मेट्रो सुरु केली आहे. एक गोष्ट मी मान्य करेल की, ही सर्व विकासकाम होत असताना पुणेकरांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. पुणेकरांची सहनशीलता जवळपास संपत आलेली आहे. पण पुढे 100 वर्षांपर्यंतच काम करायचं असेल तर थोडं आता त्रास सहन करावा लागेल. बऱ्याच गोष्टी बदलायच्या असतात, रस्ते मोठे करायचे असतात. यावेळी झाडं काढावी लागतात. तेव्हा काही वृक्षमित्र कोर्टात जातात. कामावर स्टे आणतात. अशा अनेक गोष्टी आहे. तरीही यामधून कामं सुरु आहेत. पहिली मुलींची शाळा असलेल्या भिडे वाड्यामध्ये ऐतिहासिक स्मारक निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी सरकारने 10 कोटी रुपयांची तरतूद केली असून जागा मिळवण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं, अशा भावना अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये व्यक्त केल्या आहेत.