
मेढा नगरपंचायत निवडणुकीत अखेर "धनशक्तीचाच" विजय
मेढा / दत्तात्रय पवार : जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या मेढा नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप अशी दुरंगी लढत झाली होती. शिवसेना आक्रमकपणे निवडणुकीत उतरल्याने भाजपकडून अखेर मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा वापर झाल्याने नगराध्यक्षपदाचा उमेदवार विजयी करण्यात यश मिळवले. तरीदेखील भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रूपाली वारागडे यांना १६१६, सेनेच्या रेश्मा करंजेकर यांना १५७० मते मिळाली. अवघ्या ४६ मतांनी भाजपच्या वारागडे विजयी झाल्या. तर भाजपने ११, शिवसेना ५ तर राष्ट्रवादी १ जागेवर विजय मिळवला.
मेढा नगरपंचायतीची निवडणूक लक्षवेधी ठरली होती. शिवसेनेचे नवी मुंबई संपर्कप्रमुख अंकुशबाबा कदम यांच्या नेतृत्वाखाली मेढा नगरपंचायतीत शिवसेनेने भाजपसमोर कडवे आव्हान उभे केले होते. शेवटच्या दिवसापर्यंत भाजप व शिवसेना नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. आरोप प्रत्यारोपाने ही निवडणूक चांगलीच गाजली. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, नेते वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे अशा दिगग्ज भाजप नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेत ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. तर शिवसेना शिंदे गटाचे अंकुश कदम हे एकटे असतानाही त्यांनी ही निवडणूक ताकतीने लढण्याचा चांगला प्रयत्न केला.
भाजपचे विजयी उमेदवार…
सुशांत कांबळे, सुनिता तांबे, पुष्पा मुकणे, पांडुरंग देशपांडे, हरिश्चंद्र तिवाटणे, नितीन मगरे,शिवाजी गोरे, तेजस्वी इगावे, शिवाजी देशमुख, तर बिनविरोध निवड (भाजप) अनघा करंजेकर,आनंदी करंजेकर
शिवसेना विजयी उमेदवार…
सोनाली पवार, बापूराव जवळ, रणधीर गोरे, मोनिका जवळ, शर्वरी गायकवाड, राष्ट्रवादी प्राजक्ता पार्टे.
जावळीच्या राजकारणात अंकुश कदम यांची एन्ट्री
निवडणुक प्रचारादरम्यान सेनेच्या संपर्कप्रमुख अंकुश कदम यांनी विरोधकांना १८-० होऊ देणार नाही. सेनेचा एकही उमेदवार निवडून नाही आणला तर तालुक्याच्या राजकारणातून बाहेर पडेन, अशी घोषणा केली होती. मात्र, अखेर कमी कालावधीतही कदम यांनी सूक्ष्म नियोजन करीत कडवी झुंज देत शिवसेनेने पाच नगरसेवक निवडून आणले. त्यामुळे अंकुश कदम यांची जावळीच्या राजकारणात मेढा नगरपंचायतच्या निवडणुकीच्या निमित्ताने दमदार एन्ट्री झाली आहे.
प्रभाग नऊ व प्रभाग तेरामध्ये भाजप फेल
अमित कदम यांचे बंधू जयदीप (दीपक) कदम हे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये दाखल झाले होते व त्यांनी प्रभाग नऊमधून उमेदवारी देखील मिळवली होती. मात्र, ते अपेक्षितरित्या तिसऱ्या क्रमांकावर फेकले जाऊन मोठ्या मताधिक्याने त्यांचा पराभवदेखील झाला. तर प्रभाग तेरा मधील भाजप उमेदवार रोहित देशमुख हे विजयाच्या वाटेवर असताना देखील त्यांचा अनपेक्षित रित्या या निवडणुकीत पराभव झाला.
हेदेखील वाचा : Parli vaijnath nagarparishad election result : बीडमध्ये मुंडे गढ राखणार की सोनावणे बाजी मारणार? मुंडे भावा-बहिणीची प्रतिष्ठा पणाला