Intense verbal argument between Radhakrishna Vikhe Patil and Bhaskar Jadhav Nagpur Winter Session 2024
नागपूर : राज्याचे सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. विधानसभा निवडणुकीनंतर हे पहिलेच हिवाळी अधिवेशन असल्यामुळे नेत्यांमध्ये जोरदार वादंग निर्माण होत आहे. विविध मुद्द्यांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये लाडकी बहीण योजना तसेच निवडणुकीच्या प्रचारामध्ये दिलेल्या अनेक वचनांचा समावेश आहे. तसेच सत्तास्थापनेच्या प्रक्रियेवर देखील विरोधकांनी संशय व्यक्त केला आहे. महायुतीकडून राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचा अपमान झाला असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. यावरुन सत्ताधारी विरुद्ध विरोधक आमदारांमध्ये शाब्दिक चकमक झाली आहे.
महायुतीच्या नेत्यांनी सत्तास्थापनेचा दावा करण्यापूर्वी शपथविधीची तारीख जाहीर केली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनेक दिवसांपूर्वी 5 डिसेंबर रोजी शपथविधी होणार असल्याचे जाहीर केले होते. यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. हाच मुद्दा आता सभागृहामध्ये देखील उपस्थित करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सभागृहामध्ये याबाबत प्रश्न उपस्थित केला. यावरुन भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सभागृहामध्ये सरकार स्थापनेच्या प्रक्रियेबाबत संशय व्यक्त करत भास्कर जाधव यांनी प्रश्न उपस्थित केले. भास्कर जाधव म्हणाले की, “राज्यपालांनी तुम्हाला सरकार स्थापनेसाठी कधी बोलवलं? राज्यपालांकडे पाठिंब्याची यादी कधी घेऊन गेलात? हे महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही गेलातच नाहीत. एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या पक्षांनी त्यांच्या गटनेत्यांची निवड केली. पण देवेंद्र फडणवीसांची निवड ४ डिसेंबरला झाली. त्यानंतर ४ तारखेला तीन पक्षांचे तीन नेते राज्यपालांकडे गेले की आपल्याला शपथ घ्यायची आहे. पण आझाद मैदानात शपथविधीच्या मंडपाचं काम कधी सुरू झालं? कुणी केलं? कुणी ठरवलं? राज्यपालांनी ठरवलं की आणखी कुणी ठरवलं? २२ मुख्यमंत्री शपथविधीला येणार आहेत असं सांगितलं. देशाचे पंतप्रधान येणार हेही सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री, इतर मंत्री येणार असंही जाहीर झालं. त्यांचे दौरेही नक्की झाले. तरीही राज्यपालांकडून त्यासंदर्भातली कोणतीही अधिसूचना निघाली नाही. राज्यपालांना असं गृहीत धरलं गेलं”, असंही भास्कर जाधवांनी नमूद केलं.
ही मंडळी इतकी वैफल्यग्रस्त झालीये की…
पुढे राज्यपालांनी शपथविधीची तारीख जाहीर करायची असते. ते राज्यपालांनी सांगायचं असतं. शपथविधीची जागा बदलायची असेल तरीदेखील राज्यपालांची परवानगी घ्यावी लागते”, असे स्पष्ट मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केले. यावरुन सत्ताधारी राधाकृष्ण विखे पाटील आक्रमक झाले. विरोधी पक्षांचा आक्षेप काय आहे हे कळत नाही. ही मंडळी इतकी वैफल्यग्रस्त झालीये की अध्यक्षांचाही अवमान करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. वारंवार अध्यक्षांवर आक्षेप घेण्याचं काम चालू आहे. भास्कर जाधव यांनी सभागृहाची गरीमा कायम ठेवावी. त्यांनी राज्यपालांबाबतच्या विधानाबाबत माफी मागायला हवी”, अशी मागणी विखे पाटील यांनी केली. यावरुन भास्कर जाधव पुन्हा एकदा आक्रमक झाले.
नागपूर हिवाळी अधिवेशन संबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भास्कर जाधव यावर म्हणाले की, “राधाकृष्ण विखे पाटीलजी.. तुम्ही कान साफ करा. तुमच्यासारख्या ज्येष्ठ सदस्यानं असं बोलू नये. राज्यपालांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा मुद्दा मांडला. मुळात एवढं बहुमत असताना विरोधी पक्षाची मतं ऐकून घेण्याची लेव्हल सत्ताधाऱ्यांमध्ये नाहीये. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ सदस्यानं वारंवार उभं राहणारं शोभणारं नाही”, अशी टीप्पणी भास्कर जाधव यांनी केली.
बौद्धिक दिवाळखोरीचं प्रदर्शन
यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा एकदा प्रत्युत्तर देत बौद्धिक पातळीचा उल्लेख केला. विखे पाटील म्हणाले की, भास्कर जाधवांनीही सभागृहाची गरीमा जपली पाहिजे. आम्हाला एवढा जनाधिकार मिळालाय भास्कर जाधवांनी स्वीकारावं. एवढं वैफल्यग्रस्त होऊ नका. जनतेचा निर्णय मान्य करा. माझी एवढीच सूचना आहे की भास्कर जाधवांनी आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचं प्रदर्शन दाखवू नये. आपण चांगलं काम करा. राज्यपालांच्या भाषणाबाबत बोला. त्यांचे आक्षेपार्ह शब्द आहेत. ते आम्हाला मान्य नाही”, असे उत्तर विखे पाटील यांनी दिले. त्यामुळे महायुतीच्या सरकार स्थापनेच्या प्रक्रियेवरुन सभागृहामध्ये विखे पाटील व भास्कर जाधव यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला होता.