देवेंद्र फडणवीस आणि नीलेश राणे (फोटो- टीम नवराष्ट्र/सोशल मिडिया)
नागपूर: राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. तसेच 39 मंत्र्यांनी शपथ देखील घेतली आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. विरोधकांनी परभणी आणि बीडमधील हिंसचारावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. तर नीलेश राणे हे पहिल्यांदाच आमदार म्हणून विधानसभेत निवडून आले आहेत. तर सत्ताधारी आमदारांनी देखील अनेक प्रश्नावर चर्चा केली आहे. नीलेश राणे यांनी आपल्या मतदारसंघातील मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत आक्रमक भूमिका केली आहे. मात्र सभागृहात आक्रमक झालेल्या निलेश राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांत केल्याचे पाहायला मिळाले. सभागृहात नेमके काय घडले ते जाणून घेऊयात.
काय म्हणाले आमदार नीलेश राणे?
सभागृहात बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले, माझ्या मतदारसंघात मच्छिमार बांधवांसाठी एक महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक वर्षांपासून हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमधून येणारे ट्रॉलर मोठ्या प्रमाणात मच्छिमार बांधवांचे नुकसान होत आहे. त्यामुळे मच्छिमार बांधवांना जगावे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे. मासेमारी करणारे नागरिक सुरक्षित नाहीत. समुद्राची सुरक्षा वाऱ्यावर आहे. गस्त घातली जात नाहीये. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलावे.
निलेश राणे यांनी सभागृहात मुद्दा मांडल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा याची नोंद घेतली जाईल, असे सांगितले. मात्र यावर पुन्हा एकदा आमदार निलेश राणे पुन्हा उभे राहुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलावे अशी विनंती केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उभे राहून निलेश राणे यांना एक मिनिटात शांत केल्याचे पाहायला मिळाले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मच्छिमार प्रश्नावर आक्रमक झालेल्या निलेश राणे याना शांत केले. नीलेश राणे हे संसदेतून विधानसभेत आले आहेत. त्यामुळे त्यांना माहिती नसावे की अशा प्रश्नांवर लगेच उत्तरे दिली जात नाहीत. याची दखल घेऊन कारवाई केली जाते. मात्र तुम्ही मांडलेला विषय गंभीर आहे. मी याची नोंद घेईन.
संविधानाचा अपमान सहन करणार नाही – फडणवीस
बीडमध्ये मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. तर परभणी जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. त्या पुतळ्यासमोर एका माथेफिरुने संविधानाच्या प्रतीची विटंबना केली. त्यानंतर परभणीत मोठे आंदोलन करण्यात आले. यावेळेस जाळपोळ आणि दगडफेक देखील करण्यात आली होती. या दोन्ही घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात भाष्य केले आहे.
हेही वाचा: Devendra Fadnavis: विधानसभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कडाडले; म्हणाले, “संविधानाचा अपमान…”
बीड आणि परभणीत घडलेल्या घटना अतिशय गंभीर आहेत. दोन्ही घटना सरकारने गांभीर्याने घेतल्या आहेत. अटकेची कारवाई झाली आहे. काही आरोपी फरार आहेत. त्यांना देखील लवकर अटक करण्यात येईल. आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. बीड, परभणी येथील दोन्ही घटना गंभीर आहेत. यावर सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही. अपमान करणाऱ्याना सोडले जाणार नाही. ” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.