विशाल पाटील यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे न दिल्यामुळे महायुतीवर निशाणा साधला (फोटो - टीम नवराष्ट्र)
नागपूर : सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्ये सत्ताधारी विरुद्ध विरोधक अशी जोरदार वादंग निर्माण झाला आहे. विरोधकांनी अनेक मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. महायुती सरकारने निवडणुकीदरम्यान, 2100 रुपये देण्याचे वचन दिले होते. मात्र अद्याप लाडकी बहीण योजनेचे पुढचे पैसे खात्यामध्ये आलेले नाहीत. यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी यावरुन गाणे गाऊन महायुतीला टोला लगावला आहे.
लाडक्या बहिणींवर यापूर्वी देखील राज्यामध्ये जोरदार राजकारण रंगले होते. आता पुन्हा एकदा ही योजना राजकीय चर्चेमध्ये आली आहे. यापूर्वी महायुती सरकारकडून 7500 रुपये देण्यात आले आहेत. मात्र निवडून आल्यानंतर दर महिन्याला 2100 रुपये खात्यामध्ये जमा करणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र महाय़ुतीची एकतर्फी सत्ता आल्यानंतर अद्याप कोणतेही पैसे देण्यात आलेले नाहीत. यावरुन गलीचे खासदार विशाल पाटील सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित केला. तसेच महायुतीला टोला देखील लगावला आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
काय म्हणाले विशाल पाटील?
विशाल पाटील यांनी नागपूरमधील हिवाळी अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हफ्त्यांचा मुद्दा उपस्थित केला. आमदार विशाल पाटील म्हणाले की, राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं आहे. त्याबद्दल मी महायुतीच्या नेत्यांचं आणि एनडीएचं अभिनंदन करतो. या निवडणुकीत भाजपाच्या लोकांनी ‘एक हे तो सेफ हैं’, ‘बटेंगे तो कटेंग’ अशा घोषणा दिल्या होत्या. महायुतीच्या लोकांना वाटतंय की या घोषणामुळे ते निवडणूक जिंकले आहेत. मात्र, त्यांनी विधानसभा निवडणुकीत ‘लाडकी बहीण योजने’वरून जो काही प्रचार केला होता त्या योजनेमुळे त्यांचा विजय झाला आहे. त्यावेळी त्यांनी राज्यातील महिलांना सांगितलं की या योजनेद्वारे आम्ही महिलांना पैसे देत आहोत. मात्र, राज्यात पुन्हा एकदा डबल इंजिन सरकार आल्यावर, निवडणूक जिंकल्यावर आम्ही अधिक पैसे देऊ. मात्र अजून तरी तसं काही झालेलं नाही”, असे म्हणत विशाल पाटील यांनी महायुतीला त्यांच्या आश्वासनांची आठवण करुन दिली आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशनच्या बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे विशाल पाटील म्हणाले की, “आम्हाला आणि राज्यातील महिलांना वाटत होतं की आता महायुतीचं सरकार पुन्हा एकदा आलं आहे. आता महाराष्ट्राला काहीतरी मिळेल. मात्र, तसं काही झालेलं दिसत नाही. केंद्राकडूनही काही मिळालेलं नाही. आमच्या मराठीत एक कविता आहे, येरे येरे पावसा.. तुला देतो पैसा… पैसा झाला खोटा.. पाऊस आला मोठा..! तसंच काहीसं महाराष्ट्रात घडताना दिसत आहे. पैशाचा पाऊस पाडू असं म्हटलं, लाडकी बहीण योजना दाखवून महायुतीच्या लोकांनी मतांचा पाऊस पाडून घेतला. मात्र, आता त्यांचा पैसा खोटा झाला आहे. महिलांच्या पदरी निराशा पडली आहे. राज्यातील महिलांच्या व जनतेच्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाहीत, असा टोला आमदार विशाल पाटील यांनी लगावला आहे.