Karuna Munde's reaction to Dhananjay Munde's resignation Maharashtra Political News
बीड : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. डिसेंबर महिन्यामध्ये बीडच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याचे नाव मास्टरमाईंड म्हणून समोर आले आहे. वाल्मिक कराडसोबत अर्थिक संबंध असल्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा आज राजीनामा दिला जाईल अशी राजकीय भविष्यवाणी करण्यात आली होती. याबाबत आता त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी वक्तव्य केले आहे.
धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी 3 मार्च रोजी ते मंत्री पदाचा राजीनामा देतील असे सांगितले होते. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा आधीच राजीनामा घेऊन ठेवला आहे असे वक्तव्य केले होते. यावर आता करुणा मुंडे म्हणाल्या की, “धनंजय मुंडे यांच्यावर पार्टीमध्ये दबाव आहे, मात्र त्यांची राजीनामा देण्याची इच्छा नाही, अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये लोकांचं आणि स्वत:च्या पक्षातील आमदार, खासदारांचं किती प्रेशर येतं? ही गोष्ट थांबवता येऊ शकते का? हे पाहून त्यांच्या राजीनाम्यावर निर्णय होणार आहे. मला मंत्रालयातून माहिती मिळाली आहे, माझे काही लोक आहेत, त्यांच्याकडून मला माहिती मिळाली आहे. सर्वांना माहिती आहे,” असे सूचक वक्तव्य करुणा मुंडे यांनी केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्या म्हणाले की, “धनंजय मुंडे हे छोटा मोठा आमदार किंवा मंत्री नाहीत, जो अजितदादा गट आहे, तो अजितदादा गट नसून धनंजय मुंडे गट आहे. त्यामुळे स्वत:च्या पक्षात स्वत:ची चालणार. पक्ष त्यांचा आहे मी एवढ्या वर्षांपासून त्यांच्यासोबत आहे, मला सर्व माहिती आहे. त्यामुळे मी हे सगळं ठोकपणे सांगते. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची कोणात ताकद नाही, मात्र सध्या जे प्रेशर वाढत चाललं आहे, त्यासाठी त्यांचा राजीनामा दोन दिवसापूर्वी अजितदादा यांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की, दोन दिवसांनंतर आम्ही या गोष्टीवर निर्णय घेणार आहोत, त्यामुळे ही गोष्ट आता दोन दिवस पुढे ढकलेली आहे,” असे मत करुणा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
करुणा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. त्या म्हणाल्या की, “मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटीसाठी निवेदन दिलेलं आहे, मात्र त्यांनी मला आतापर्यंत भेटीसाठी वेळ दिला नाही. आता मी त्यांना पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी पत्र देत आहे, त्याचबरोबर विधानभवनात जाण्याचाही प्रयत्न करणार आहे. माझी रोखठोक भूमिका आहे, त्यामुळे मला तिकडे जाऊ देणार नाहीत. मात्र त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करणार आहे, आणि देवेंद्र फडणीस यांना भेटण्याचाही प्रयत्न करणार आहे. त्यांचा राजीनामा घेतला नाही तर अंजली दमानिया, सुरेश धस या सगळ्यांसोबत मिळून आम्ही पूर्ण महाराष्ट्रात असे लोक मंत्रालयात नको यासाठी महाराष्ट्राला जागृत करणार आहोत,” अशी स्पष्ट भूमिका करुणा मुंडे यांनी घेतली आहे.