
Ladki Bahin Yojana, Majhi Ladki Bahin Scheme, DBT Transfer,
ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून ३३९ कोटी १४ लाख रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय २४ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आला होता. या निधीतून पात्र लाभार्थी महिलांना ऑगस्ट महिन्याचा १,५०० रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे.
महिला व बालविकास विभागाच्या माहितीनुसार, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजनेद्वारे राबवली जाते. त्यामुळे पात्र लाभार्थींच्या खात्यात रक्कम थेट जमा केली जाते.
ऑगस्टच्या हप्त्याची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा होत असल्याने प्रत्येक महिलेच्या खात्यात पैसे एकाच वेळी जमा होतीलच असे नाही. त्यामुळे लाभार्थींनी आपल्या बँक खात्यातील व्यवहार तपासावा. बँकेकडून SMS प्राप्त झाला आहे का, हेही पाहावे. SMS न आल्यास मोबाइल बँकिंग, एटीएम किंवा बँकेच्या अधिकृत ग्राहक सेवा माध्यमातून खात्यातील रक्कम तपासता येईल.
जुलैपर्यंतचे हप्ते लाभार्थी महिलांना मिळाले होते. त्यानंतर ऑगस्टचा हप्ता रखडल्याने ऑगस्ट आणि सप्टेंबरचे दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार का, याबाबत चर्चा होती. मात्र सध्या उपलब्ध माहितीनुसार ऑगस्ट महिन्याच्या १,५०० रुपयांच्या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात झाली आहे.
त्यामुळे आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे. सप्टेंबरचा हप्ता आणि दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र देण्याबाबत अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणताही दावा निश्चित मानणे योग्य ठरणार नाही.