Manoj Jarange Patil aggressive to dhnanjay Munde because Deshmukh family receiving threats
जालना : बीड हत्या प्रकरणामुळे राज्यामध्ये वातावरण तापले आहे. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घुणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त केला जात आहे. या प्रकरणामध्ये मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मनोज जरांगे पाटील हे सर्वपक्षीय मूक मोर्चामध्ये देखील सामील झाले होते. यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना इशारा दिला आहे. धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही अशा कडक शब्दांत जरांगे पाटील यांनी रोष व्यक्त केला आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बीड सरपंच हत्या प्रकरणावरुन पुन्हा एकदा कडक भूमिका घेतली आहे. जरांगे पाटील म्हणाले की, “मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना पोलीस ठाण्यात धमकविण्यात आले, अशी माहिती आम्हाला मिळाली. मी कुणाचेही नाव घेऊन उगाच बोलत नाही. पण यापुढे संतोष देशमुख यांचे कुटुंबिय आणि त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्या केसाला जरी धक्का लागला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावरही फिरू देणार नाही. आमचा एक भाऊ गेला, तो आम्ही सहन केला. आतापर्यंत आम्ही कुणाचेही नाव घेतले नाही. पण यापुढे देशमुख कुटुंबियांना जर त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही,” असा थेट धमकीवजा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले, “आम्हाला माज किंवा मस्ती नाही. पण आमची मुले जर रस्त्यावर येणार असतील तर आमच्यापुढे आता पर्याय नाही. तुम्ही लोकांना मारून आरोपींना घरात लपवून ठेवत असाल तर हे कसे काय सहन करायचे. सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सापडायला लागले? याचा अर्थ तुमच्या सरकारमधील मंत्री आरोपींना सांभाळत होते. या हत्येमधील आरोपी आणि खंडणीमध्ये पकडलेल्या आरोपींची नार्को टेस्ट केली पाहीजे. त्यांना आतापर्यंत कुणी सांभाळले, त्यांना सहआरोपी केले पाहीजे.” अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “आम्ही संतोष देशमुख यांच्यासाठी न्याय मागायला पुढे आलो तर आम्ही जातीयवादी होतो आणि तुम्ही आरोपींना सांभाळता, मग तुम्ही कोण होता. संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या केली, तो जातीयवाद नाही का? सरकार आणि इतरांना काय म्हणायचे असेल तर ते म्हणू द्या. पण समाज म्हणून आपल्याला लढावे लागेल,” असे स्पष्ट मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार आहेत. येत्या 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी बीड हत्या प्रकरणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.