
निवडणुकीच्या तोंडावर अनेकांनी केले पक्षांतर
छत्रपती संभाजीनगर : राज्यात नगरपरिषद, नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच नगरपरिषद निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी बहुतांश पक्षांनी आपली उमेदवार यादी जाहीर केलेली नाही. त्यामुळे इच्छुक कार्यकर्त्यांच्या हालचालींना वेग आला आहे.
कोणी इच्छुक उमेदवार पक्ष कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत, तर कोणी उमेदवारीच्या आशेने नेत्यांच्या मागेपुढे करण्यात व्यस्त असून, संधीच्या शोधात असलेले राजकीय नेते सध्या ‘बेटिंग आणि स्विचिंग मोड’मध्ये दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांची उमेदवारी जाहीर करून त्यांनी अर्ध्याहून अधिक जागांवर उमेदवार निश्चित केले आहेत. प्रचारालाही त्यांनी सुरुवात केली असून, इतर पक्ष त्यामागेच धावत आहेत.
त्याउलट महाविकास आघाडीचे उमेदवार ठरवण्यात अजूनही विलंब होत आहे. युतीतील भाजप-शिंदे गटाचा जागावाटप तिढा सुटलेला नाही तर काही प्रभागांत प्रभावी उमेदवार मिळत नसल्यानेही अद्याप उमेदवार जाहीर झालेले नाहीत.
प्रभावी उमेदवारांचा शोध
महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी वगळता महायुतीतील संभाव्य उमेदवार गोंधळात आहेत. काहींनी तर ‘जिथे संधी, तिथे पक्ष’ या सूत्रावर चालत थेट पक्षांतराचा मार्ग धरला आहे. त्यामुळे दररोज नवनवीन राजकीय घडामोडी सुरू असून, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या राजकीय हालचालींची चांगलीच चर्चा आहे. राजकारणातील विचारधारा, पक्षनिष्ठा आणि वचनबद्धतेचा पाया आता डळमळीत झाल्याचे गंगापूरच्या राजकीय हालचालीतून स्पष्ट दिसत आहे.
सत्तेच्या समीकरणात फायद्याचे गणित महत्त्वाचे
सत्तेच्या समीकरणात फायद्याचे गणित महत्त्वाचे ठरू लागले असून, मतदारांच्याही मनात संभ्रमाचे वातावरण आहे. वडील एका पक्षात, तर मुलगा विरोधी पक्षात असे चित्र आता सर्वसामान्य झाले आहे. गंगापूरमधील राजकारण सध्या कुणाचा कुणाशी समझोता आणि कुणाचा कुणाशी संघर्ष? या प्रश्नाभोवती फिरत आहे.
हेदेखील वाचा : माळशिरस तालुक्याच्या राजकारणात पुन्हा उलथा पालथ! अजित पवार अन् धवल मोहिते पाटलांची भेट