
Maharashtra Politics : राज्यात लवकरच 'ऑपरेशन टायगर-3' होणार? महायुतीतील मंत्र्याने केले सूचक विधान
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग येण्याचे संकेत मिळत आहेत. राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी ‘ऑपरेशन टायगर-३’बाबत सूचक विधान करत अनेक नेते, आमदार आणि पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याचे सांगत शिरसाट यांनी आगामी काळात राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडी घडण्याचे संकेत दिले.
एकनाथ शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी नुकतेच यावर भाष्य केले होते. दरम्यान, परिसीमन विधेयकाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचेही शिरसाट यांनी स्वागत केले. चांगल्या कामाला पक्षीय राजकारण बाजूला ठेवून पाठिंबा देणे ही मोठी हिंमत असल्याचे त्यांनी म्हटले.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे एका लोकप्रतिनिधीला सर्व मतदारांपर्यंत पोहोचणे कठीण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपण पहिल्यांदा निवडणूक लढवली, तेव्हा एका मतदारसंघात १२ ते १३ लाख मतदार होते. आता ही संख्या २५ ते ३० लाखांपर्यंत पोहोचली असून महाराष्ट्रातील काही भागांत ती ४० लाखांपर्यंत गेली आहे, असे सुळे यांनी नमूद केले. मात्र, परिसीमनाबाबत सरकारकडून अद्याप कोणताही नवा अधिकृत प्रस्ताव किंवा विधेयकाचा मसुदा मिळालेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एकीकडे, परिसीमनाच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चेचे वातावरण असताना दुसरीकडे ‘ऑपरेशन टायगर-३’च्या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पक्षांतराच्या चर्चांना पुन्हा उधाण
मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्रात लवकरच ‘ऑपरेशन टायगर-३’ सुरू होण्याचे संकेत दिले होते. त्यांच्या विधानाला संजय शिरसाट यांनी दुजोरा दिला. उदय सामंत यांनी सांगितलेली माहिती खरी असून अनेक नेते, आमदार आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्याशी सातत्याने संवाद सुरू आहे, असे शिरसाट यांनी स्पष्ट केले. या संपर्कातील नेत्यांबाबत नेमका निर्णय कधी आणि कोणता घ्यायचा, हे एकनाथ शिंदे ठरवतील, असेही त्यांनी सांगितले.
FAQ
1. ‘ऑपरेशन टायगर-३’ बाबत विधान कोणी केले?
राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी याबाबत सूचक विधान केले.
2. एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात कोण असल्याचा दावा करण्यात आला आहे?
अनेक नेते, आमदार आणि पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केला.
3. ऑपरेशन टायगर-३ बाबत एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणता अधिकार असल्याचे सांगण्यात आले?
योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याचे शिरसाट यांनी सांगितले.