Maratha leader Manoj Jarange Patil Corruption allegations against Dhananjay Munde
बीड : मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घुणपणे हत्या करण्यात आली. घटनेला 19 दिवस उलटून देखील अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेले नाही. संतोष देशमुख यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून बीडमध्ये जनसमुदाय लोटला आहे. संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला आहे. यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील सामील झाले आहेत.
संतोष देशमुख यांची गंभीररित्या हत्या करण्यात आली. याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये दिलेली माहिती खोटी असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला होता. यानंतर आज बीडमध्ये विराट मोर्चा काढण्यात आलेला आहे. सर्वपक्षीय या मोर्चामध्ये शरद पवार, जितेंद्र आव्हाड, संभाजीराजे छत्रपती आणि मनोज जरांगे पाटील हे सामील झाले आहेत. पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केली नसल्यामुळे रोष व्यक्त केला जात आहे. तसेच या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड याला देखील अटक न केल्यामुळे सर्वांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
महाराष्ट्र राजकारणसबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मूक मोर्चामध्ये मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सहभाग घेतला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये यापूर्वी देशमुख कुटुंबियांची भेट देखील घेतली होती. मोर्चाच्या आधी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे. “मुख्यमंत्री साहेब तुम्ही लक्षात ठेवा, यांना पाठीशी घालू नका. अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होईल. तुम्ही आरोपींना अटक करा”, असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. तसेच राज्यभरात जिल्ह्या-जिल्ह्यात मोर्चे काढण्यात येणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पुढे मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या तपासाबाबत हालगर्जीपणा करू नये. जाणून बजून तुमच्या सत्तेत काही लोक आहेत. तुम्ही जातीवाद पसरेल असं काही काम करू नका. काही लोक गुंडगिरी करायला लागले, काही लोक बंदूका दाखवायला लागले, काही लोक शिवीगाळ करायला लागले, जमिनी बळकायला लागले, पोलिसांना आरेरावी करायला लागले आहेत. याचा बिमोड करण्याचं काम सरकारचं आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांभाळू नये. अन्यथा हे बाजूला होतील आणि तुम्हीच तोंडघशी पडताल. मुख्यमंत्री साहेब तुम्ही लक्षात ठेवा, यांना पाठीशी घालू नका. अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होईल. तुम्ही आरोपींना अटक करा. या घटनेत कोणाकोणाचे रेकॉर्ड आहेत ते तपासा आणि मग त्यामध्ये मंत्री असो किंवा खासदार असो किंवा कोणीही असो त्यांना लगेच जेलमध्ये टाका. आज १९ दिवस झाले तरीही आरोपी सापडत नाहीत. याचा अर्थ मुख्यमंत्री देखील यांना पाठीशी घालत आहेत का?”, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.