
Maharashtra Politics, Kunbi Certificate, Maratha Reservation Yatra
आज देवळाई परिसरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यस्तरीय ‘मराठा आरक्षण मंथन परिषद’ आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत मराठवाड्यातील निमंत्रितांनी आरक्षणाच्या सद्यस्थितीवर चर्चा केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करण्यात आली.
Raigad News: नेरळच्या विकासकामांवरून मोठा वाद! एमएमआरडीएकडे तक्रार दाखल, जुन्या तारखांनी
रमेश केरे म्हणाले की, “हैदराबाद गॅझेटिअर, एसईबीसी आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यांवर सरकारने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. मुख्यमंत्री आणि आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे. मराठवाड्यातील अभ्यासक आणि समन्वयकांची बैठक घेण्याचे आश्वासन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले होते. मात्र, अद्याप ही बैठक झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात ५८ लाख कुणबी नोंदी सापडल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. मात्र, या नोंदी मराठवाड्यातील आहेत की संपूर्ण राज्यातील, तसेच त्या १९६७ नंतरच्या आहेत का, याबाबत सरकारने स्पष्ट खुलासा करावा, अशी मागणी केरे यांनी केली.
आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याऐवजी समित्या आणि आयोग नियुक्त करून तो लांबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण सरकारची भूमिका समाजासमोर मांडण्यासाठी ही जनजागृती यात्रा काढली जाणार आहे. आरक्षणाचा संघर्ष मराठवाड्यातून सुरू झाल्याने पहिल्या टप्प्यात याच भागात जनजागृती केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारमधील काही प्रतिनिधी संघटनांना बदनाम करून मराठा समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप नानासाहेब जावळे यांनी केला. आमचा रोष सरकारच्या धोरणांवर आहे. दरम्यान, मनोज जरांगे आणि आम्ही एकाच उद्देशाने आरक्षणासाठी लढत आहोत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. त्यांनीही या यात्रेत सहभागी व्हावे, अशी अपेक्षा रमेश केरे यांनी व्यक्त केली.
या परिषदेला राजेंद्र दाते पाटील, नानासाहेब जावळे, किशोर चव्हाण, डॉ. शिवानंद भानुसे, भीमराव मराठे, गणेश कदम, राहुल पाटील यांच्यासह मराठवाड्यातील विविध भागांतील समन्वयक उपस्थित होते.