MLA Rohit Pawar target Modi government over PM Kisan Samman Nidhi Yojana
PM Kisan Samman Nidhi : मुंबई : केंद्र सरकारकडून देण्यात आलेली किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासादायक योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत, लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत मिळते. दर चार महिन्यांनी २००० रुपये खात्यात येतात. परंतु सर्व शेतकऱ्यांना आता त्याचा लाभ मिळणार नाही. या योजनेबाबत काही नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील 60 हजार शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही. यावरुन आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. केंद्र सरकार या योजनेत शेतकऱ्याला 6 हजारांचा हप्ता देते. आता या योजनेत एक बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, पती आणि पत्नीच्या नावावर शेती असेल तर केवळ पत्नीलाच मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी पतीला मानधन देण्यात येणार नसल्याचे समोर आले आहे. कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ देण्याचा निकष लागू करण्यात आला आहे. त्याचा फटका राज्यातील 60 हजार शेतकऱ्यांना बसला आहे. त्यांच्या बँक खात्यात योजनेचा 20 वा हप्ता जमा झाला नसल्याचे वृत्त समोर आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आमदार रोहित पवार यांनी शेतकरी सन्मान योजनेच्या नियमांमध्ये बदल केल्यामुळे जोरदार टीका केली आहे. त्यांनी लाडक्या बहिणींनंतर आता लाडक्या भावांची देखील फसवणूक केली जात असल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत रोहित पवारांनी टीकास्त्र डागले. रोहित पवार यांनी लिहिले आहे की, कुटुंबात नवरा आणि बायको दोघांच्या नावावर शेती असल्याने दोन लाभार्थी असतील तर आता केवळ कुटुंबातील महिला लाभार्थ्यालाच पीएम किसानचे दोन हजार मिळतील पुरुष लाभार्थ्याला दोन हजार मिळणार नाहीत, हा केंद्र सरकारचा फतवा अजबच म्हणावा लागेल, असे रोहित पवार म्हणाले.
कुटुंबात नवरा आणि बायको दोघांच्या नावावर शेती असल्याने दोन लाभार्थी असतील तर आता केवळ कुटुंबातील महिला लाभार्थ्यालाच पीएम किसानचे दोन हजार मिळतील पुरुष लाभार्थ्याला दोन हजार मिळणार नाहीत, हा केंद्र सरकारचा फतवा अजबच म्हणावा लागेल.
एकीकडे जीएसटी मध्ये कपात करून दिंडोरा पिटायचा… pic.twitter.com/F1tpsLd0QB
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 9, 2025
पुढे ते म्हणाले की, एकीकडे जीएसटीमध्ये कपात करून दिंडोरा पिटायचा आणि दोनच दिवसात शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचे हफ्ते बंद करायचे? केंद्र सरकारला हे शोभते का? आधीच पीएम किसान चे पैसे मिळतात म्हणून लाडक्या बहिणींना लाडक्या बहिण योजनेच्या मदतीपासून राज्य सरकारने वंचित ठेवले आणि आता लाडक्या भावांना वंचित ठेवत आहात? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नैसर्गिक आपत्तीचा फटका आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका कुटुंबातील सर्वच शेतकऱ्यांना बसतो त्यामुळे कुटुंबातील एकाच शेतकऱ्याला मदत देण्याचा निर्णय पूर्णतः चुकीचा आहे, केंद्र सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. त्यामुळे आता शेतकरी सन्मान योजनेच्या बदलेल्या नियमांवरुन सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.