MNS Bala Nandgaonkar reaction on dadar kabutar khana mumbai political news
दादर : दादरमधील सुप्रसिद्ध कबुतरखाना हा मुंबई पालिकेच्या वतीने बंद करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनेनंतर हा निर्णय घेण्यात आला. मात्र यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. कबुतरखाना बंद करण्याच्या निर्णयाला जैन समाजाने तीव्र विरोध दर्शवला. यावरुन जैन समाजाने लावण्यात आलेली तडपत्री फाडून कबुतरांना दाणापाणी देण्याचा प्रयत्न केला. यामुळे दादरमधील कबुतरखाना हा चर्चेत आला आहे. यामुळे मुंबईतील कबुतरखान्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. या प्रकरणावर पहिल्यांदाच मनसेची भूमिका समोर आली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. तसेच मुंबईतील जागोजागी असणाऱ्या कबुतरखान्याबाबत देखील मत व्यक्त केले आहे. कुबतरखाना बंद असावा या हायकोर्टाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने देखील संमती दाखवली आहे. यावर आता मनसेने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, ‘माणसं महत्त्वाची आहेत की कबुतरं महत्त्वाची आहेत, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कोर्टाने जो निर्णय घेतलेला आहे, आम्ही त्या निर्णयाच्या बाजूने आहोत,’ अशी भूमिका मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बाळा नांदगावकर म्हणाले की, “कोणत्याही जैन मुनींनी शस्त्र उचलण्याची भाषा केलेली नाही. निलेश जैन मुनी नावाचे एक सन्माननीय मुनी आहेत, तेच एकटे असं बोलले आहेत. तसेच सुप्रीम कोर्टाकडेही त्यांनी जी याचिका दाखल केली, ती त्यांनी दाखल करुन घेतलेली नाही. त्यासोबतच माझं असं म्हणणं होतं की यात माणसं महत्त्वाची आहेत की कबुतरं महत्त्वाची आहेत, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. शेवटी माणसं जगली तर कबुतरांना खायला घालतील ना,” असा खोचक टोला मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “पण जर कबुतरांमुळे आमचा जीव धोक्यात येणार असेल तर त्याचा माणुसकीच्या दृष्टीकोनातून विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मी असं म्हणालो होतो की मला असं वाटतंय की खरंच जीवदया आणि भूतदया आम्हालाही करावीशी वाटते. आम्हीही करतो. पण याचा अर्थ असा नाही की लोकांना त्रास होतो आणि आपण जीवदया भूतदया करत राहायचे. त्यापेक्षा ज्या ज्या सोसायटीत आपण आपले फ्लॅट घेता, त्या त्या सोसायटीत आपण स्विमिंगपूल, जिम यांसारख्या गोष्टी घेतो. मग त्याच सोसायटीत बाजूला एखादा कबुतरखाना सुरु केला, तर काय बिघडलं. तो करा, म्हणजे जवळच्या जवळ तुम्हाला दाणापाणी देता येईल,” असेही बाळा नांदगावकर यांनी सुचवले आहे.
पुढे ते म्हणाले की, “यात ८० ते ९० टक्के जैन समाज विरोधात आहे. कारण जैन समाजाला कळलं आहे. एका डॉक्टरांनी काय नुकसान होतात ते सांगितलेले आहेत. त्यामुळे माणसांना महत्त्वं देणं, आरोग्याची काळजी घेणं, पर्यावरणाला नुकसान होणार नाही, हे पण करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे कोर्टाने जो निर्णय घेतलेला आहे, आम्ही त्या निर्णयाच्या बाजूने आहोत,” असे देखील स्पष्ट मत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले आहे.