mns raj thackeray and shivsena shinde group uday samant meet before bmc elections 2025
मुंबई : राजकीय वर्तुळामध्ये हालचालींना वेग आला आहे. सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका घेण्यासाठी हिरवा कंदील दिल्यामुळे सर्व पक्ष कामाला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर आलेला पराभव लक्षात घेता महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांनी मोट बांधण्यास सुरुवात केली आहेत. तसेच महायुतीमधील मित्रपक्षांनी देखील बोलणी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, मनसे नेते राज ठाकरे आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांची भेट झाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
मनसे नेते राज ठाकरे यांचे नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे युती करणार असल्याची चर्चा सुरु होती. याबाबत ठाकरे गटाकडून सूचक वक्तव्ये आणि सोशल मीडिया पोस्ट केल्या जात होत्या. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता राज ठाकरे यांनी शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. त्यामुळे राज ठाकरे नक्की कोणत्या युतीचा झेंडा हाती घेणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उदय सामंत यांनी राज ठाकरेंच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भेटीवर मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. उदय सामंत म्हणाले की, “सकाळी काही कामासाठी मी या भागात आलो होतो. त्यामुळे राज ठाकरे यांना फोन केला. मी गप्पा मारण्यासाठी येत असल्याचे सांगितले. त्यांनाही वेळ होता. त्यांनी होकार दिला. राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यावर अनेक विषय कळतात. विकासाबाबत माहिती मिळते. त्यामुळे ही अराजकीय भेट होती. परंतु तुमच्या मनात जी शंका आहे. ती कोणतीही चर्चा झाली नाही. अतिशय चांगली चर्चा झाली. चर्चेदरम्यान चहा घेतला. खिचडी खाल्ली आणि निघालो,” अशी मिश्किल टिप्पणी उदय सामंत यांनी केली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचम्यासाठी क्लिक करा
मुंबई मनपाबाबत चर्चा झाली का? असा प्रश्न माध्यमांनी विचारला. याबाबत उदय सामंत म्हणाले, “मुंबई मनपासंदर्भात चर्चा झाली असती तर मी जाहीरपणे सांगितले असते. त्यासाठी पत्रकार परिषद घेतली असती. आजची भेट ही अराजकीय होती. आता मी एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी जाणार आहे. त्यामुळे तुम्ही म्हणाल, राज ठाकरे यांच्यासोबत झालेली चर्चा एकनाथ शिंदे यांना सांगणार? परंतु तसे काही नाही. माझी आणि राज ठाकरे यांची चौथी भेट आहे. आजच्या चर्चेत कोणतीही राजकीय खिचडी झाली नाही,” असा टोला शिंदे गटाचे नेते व मंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे.